जेष्ठ नागरिकांना आता मोफत देवदर्शन...
X
महाराष्ट्रात हजारो नागरिक दररोज लालपरीतून राज्याच्या कानाकोपऱ्यात प्रवास करत असतात. त्यामध्ये जेष्ठ नागरिकांची संख्या सुद्धा मोठी आहे. हे पाहता राज्य सरकारने काही महिन्यापूर्वी जेष्ठ नागरिकांना एसटीतून प्रवास करताना कोणतेही प्रवासभाडे न आकारण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतला. त्यानंतर आता जेष्ठ नागरिकांना सरकारकडून राज्यभरात मोफत देवदर्शनाची सुविधा देण्यात येणार असल्याची माहिती शिंदे यांनी दिली आहे. एसटी महामंडळातर्फे जेष्ठ नागरिकांना तिर्थक्षेत्रांना भेटी देण्यात येणार असल्याचा मेगा प्लान तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले आहेत.
आता दिल्ली आणि उत्तरप्रदेशप्रमाणे महाराष्ट्रातही जेष्ठ नागरिकांना मोफत तिर्थक्षेत्राला भेट देता येणार आहे. प्रत्येक महिन्याच्या वीकेंडला म्हणजेच शनिवार आणि रविवारी जेष्ठ नागरिकांना सरकारकडून देवदर्शन घडवण्यात येणार आहे. त्यासाठी एस.टी. महामंडळाने दोन हजार एस.टी. बसेस उपलब्ध करुन देण्याची तयारी दाखवली आहे. मोफत देवदर्शनाचा लाभ घेणाऱ्या राज्यातील जेष्ठ नागरिकांना केवळ प्रवासभाडे माफ असणार आहे.
देवदर्शनावेळी राहण्याचा आणि जेवणाचा खर्च मात्र नागरिकांना करावा लागणार आहे. या योजनेमुळे तोट्यात सुरु असलेल्या एस.टी. वर अतिरिक्त बोजा बसणार आहे. सध्या महाराष्ट्रात ६५ वर्षावरील नागरिकांना ५० टक्के प्रवास सवलत तर ७५ वर्षावरील नागरिकांना मोफत प्रवास देण्याची योजना सुरु आहे. मात्र आता देवदर्शनाच्या योजनेत मात्र सर्वचं जेष्ठ नागरिकांना मोफत प्रवास करण्यात येणार आहे. याबाबत लवकरच राज्य शासनाकडून अधिसूचना काढण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.