Home > News Update > #MaxMaharashtraमंत्रीमंडळात लम्पी आजाराचे पडसाद; पशुधन वाचविण्याचे मुख्यमंत्र्याचे आदेश

#MaxMaharashtraमंत्रीमंडळात लम्पी आजाराचे पडसाद; पशुधन वाचविण्याचे मुख्यमंत्र्याचे आदेश

#MaxMaharashtraमंत्रीमंडळात लम्पी आजाराचे पडसाद; पशुधन वाचविण्याचे मुख्यमंत्र्याचे आदेश
X

ग्रामीण महाराष्ट्राला हादरा देणाऱ्या लम्पी रोगाची अखेर राज्यमंत्रिमंडळाला दखल घ्यावी लागली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत पशुसंवर्धन विभाग आणि अधिकाऱ्यांना सज्ज राहून लम्पी आजार रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत.

मॅक्समहाराष्ट्रने यासंदर्भातील वृत्त देऊन सर्वप्रथम आवाज उठवला होता. पशुधन ही आपली संपत्ती त्याची जपणूक करणे आवश्यक असून सध्या राज्यात लम्पी आजाराने पशुंना ग्रासले आहे. या आजारावर मात करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने आवश्यक पाऊले तातडीने उचलावीत, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिले. पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव जे.पी. गुप्ता यांनी या आजारासंदर्भात माहिती दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्व पशुवैद्यकीय अधिकारी यांनी सज्ज राहून आपापल्या भागात हा आजार रोखण्यावर बारकाईने लक्ष द्यावे असेही सांगितले.

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गोवंश व महिष (म्हैस) वर्गातील जनावरांना लम्पी या विषाणूजन्य त्वचारोगाची लागण झालेली आहे. हा वेगाने पसरणारा संसर्गजन्य आजार असला तरी पशुधन दगावण्याचे प्रमाण कमी आहे. तसेच पशुपालकांनी जनावरांची वेळीच काळजी घेतल्यास आपल्या जनावराला लम्पी आजाराची लागण होण्यापासून वाचविता येईल, हे लक्षात घेऊन पशुसंवर्धन विभागाने पशुपालकांमध्ये जनजागृतीसाठी करावी. तसेच रोगनियंत्रण लसीकरण करण्यासाठी मोहिम राबवावी. तसेच बाधित जनावरांना औषधोपचार उपलब्ध होतील याची काळजी घ्यावी. यासाठी संबधित पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी आपल्या भागात पशुपालकांच्या मदतीसाठी उपलब्ध रहावे असेही मुख्यमंत्री म्हणाले.

लम्पी आजाराबाबत मदतीसाठी पशुपालकांनी पशुवैद्यकीय दवाखान्यात अथवा विभागाचा टोल फ्री क्रमांक १८००२३३०४१८ अथवा राज्यस्तरीय कॉल सेंटर मधील पशुसेवेचा टोल फ्री क्र. १९६२ देण्यात आला आहे अशी माहितीही राज्य मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली.

Updated : 20 Sept 2022 5:14 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top