'पीएम केअर फंडातील व्हेंटिलेटर घेताहेत अंतिम श्वास '
X
मुंबई: राज्यात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत असताना केंद्र सरकारने राज्यसरकारला मदत म्हणून पंतप्रधान सहाय्यता निधीकडून व्हेंटिलेटर उपलब्ध करून दिले होते. मात्र तांत्रिक त्रुटी असल्याने यातील अनेक व्हेंटिलेटर धूळखात पडले असल्याचं पाहायला मिळत आहे. औरंगाबादच्या बऱ्याच रुग्णालयात हे व्हेंटिलेटर बंद पडून आहे.
पंतप्रधान साहाय्यता निधीतून औरंगाबादच्या घाटी रुग्णालयासह जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत दिलेल्या व्हेंटिलेटरवर 'नॉट वर्किंग'ची पाटी लावण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. घाटीसह एमजीएम रुग्णालय व इतर अनेक रुग्णालयांच्या कोविड वॉर्डामध्ये व्हेंटिलेटर बंद पडून आहे. तर एकट्या घाटीमध्ये विनावापर ५० व्हेंटिलेटर पडून आहेत. काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये सुद्धा असाच प्रकार पाहायला मिळाला होता. केंद्र सरकारने नाशिक महापालिकेला ६० व्हेंटिलेटर पाठवले. परंतु ते कनेक्टरशिवाय पाठविल्याने वापरलेच गेले नाही.
पीएम केअर्स फंडमधून राज्यांना पाठविलेले व्हेंटिलेटर सदोष आणि निकृष्ट दर्जाचे असल्याचा असाच एक प्रकार पंजाबमध्ये उघडकीस आला. फरीदकोट येथे केंद्राने पाठवलेल्या ८० पैकी तब्बल ७१ व्हेंटिलेटर खराब असल्याची माहिती गुरुगोविंद सिंग वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाने जाहीर केले आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, देशभरात भारत इलेट्रॉनिक्स लिमिटेड (बेल), आग्वा लि., ज्योती सीएनसी, एएमटीझेड या कंपन्यांनी पीएम केअर फंडातून 'मेक इन इंडिया'अंतर्गत व्हेंटिलेटर बनविले आणि पूर्ण देशात वितरित केले. मात्र देशभरात अनेक ठिकाणी केंद्राने पाठवलेल्या व्हेंटिलेटरमध्ये तांत्रिक बिघाडी येत असल्याचे समोर आले आहे.