Maharashtra Cabinet Expansion | मंत्रिमंडळ विस्तारावरून ED सरकारमध्ये संघर्ष
येत्या 19 जूनला शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. त्याआधीच शिंदे-फडणवीस सरकारचा प्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्तार होण्याची चर्चा सुरू झालीय. तर दुसरीकडे याच विस्तारावरून सरकारमध्ये संघर्ष सुरू झालाय.
X
महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारच्या तिस-या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा पुन्हा सुरू झालीय. हा विस्तार याच महिन्यातील 19 जूनच्या आधी होणार असल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे मलईदार खाती मिळावी आणि मंत्रीपदावर वर्णी लागावी यासाठी आता शिवसेना-भाजपमधील इच्छुकांमध्येच संघर्ष पेटलाय.
सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगाकडून शिंदे-फडणवीस सरकारला दिलासा मिळालाय. त्यामुळं अपेक्षेप्रमाणे या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू झाली. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या रविवारी (4 जून) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतली. त्यानंतर विस्ताराच्या चर्चांना अधिकच ऊत आला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आलेल्या सर्वच आमदारांना मंत्रिमंडळात सामावून घेणं शक्य नाही, अशा परिस्थितीत शिंदे यांना पाठिंबा देणा-या मित्रपक्षांनाही मंत्रिमंडळात स्थान द्यावं लागणार आहे. 19 जूनला शिवसेनेचा वर्धापन दिवस आहे. त्याआधीच हा विस्तार होईल, अशी शक्यता शिवसेनेचे मुख्य प्रतोद, आमदार भरत गोगावले यांनी व्यक्त केलीय. तर दुसरीकडे ज्या 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे आहे, त्याचा निर्णय कधी येतोय, याकडेही शिवसेनेचं लक्ष लागलंय. अशा परिस्थितीत मंत्रिमंडळ विस्ताराकडे अपात्रतेची टांगती तलवार असलेल्या आमदारांसह इतर आमदारांचंही लक्ष लागलेलं आहे. विस्तार झालाच तर तो 19 जूनच्या आधी होईल, कदाचित याच आठवड्यात होईल, असंही आमदार गोगावले यांचं म्हणणं आहे. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारल्याशिवाय विस्तारासंदर्भात खात्री देता येणार नाही. तरी देखील विस्ताराची तयारी जवळजवळ पूर्ण झाल्याचं सांगायलाही गोगावले विसरले नाहीत. मी पहिल्या रांगेत होते, त्यामुळं मला मंत्रिपद मिळेल, यात दुमत नाहीये. काही तांत्रिक अडचणींमुळे आम्ही संयम बाळगून होतो, आता मात्र संधी मिळू शकते, असा विश्वास गोगावले यांनी व्यक्त केलाय.
शिंदे-फडणवीस सरकारने 11 महिन्यांचा कालावधी पूर्ण केलाय. अशा परिस्थितीत मंत्रिपदापासून 11 महिने दूर राहावं लागलेल्या इच्छुकांचा मात्र संयम सुटत चाललाय. प्रसारमाध्यमांनी अशा इच्छुकांना विस्ताराविषयी विचारणा केली असता, नाईलाजाने त्यांना विस्तारासंदर्भात नवीन तारखा सांगाव्या लागत आहेत. शिवसेना-भाजपच्या प्रत्येकी 10 आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे. सध्याच्या मंत्रिमंडळात शिवसेना-भाजप मिळून प्रत्येकी 10 कॅबिनेट मंत्री आहेत. त्यात आणखी 23 जणांना संधी मिळण्याची शक्यता आहे.
विद्यमान शिंदे-फडणवीस सरकारमधील वादग्रस्त अशा मंत्र्यांना डच्चू देऊन नवोदितांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. यात कृषीमंत्री अब्दुल सत्तार, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत, अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, अतुल सावे यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे. सरकारमध्ये एकही महिला मंत्री नसल्याची विरोधकांकडून जोरदार टीका झाल्यानंतर यंदाच्या विस्तारात महिला मंत्र्यांचा समावेश केला जाण्याची शक्यता आहे.
शिंदेंच्या शब्दावर विश्वास पण...
तळागाळातून काम करत मुख्यमंत्रीपदापर्यंत एकनाथ शिंदेंनी काम केलंय. त्यामुळं कार्यकर्त्यांना कसं हाताळायचं यात मुख्यमंत्री शिंदेंचा हातखंडा आहेच. मात्र, मंत्रिपद वेगळं आणि मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी वेगळी असते. अशा परिस्थितीत एकनाथ शिंदेना सोबत आलेल्या आमदारांना सांभाळून सरकारही चालवायचं आहे. मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या शिंदे समर्थक आमदारांमध्ये प्रचंड नाराजी असल्याचं जाणवतं आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लक्षात घेता जर या विस्तारात मंत्रीपदाची संधी मिळाली तर त्याचा फायदा आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत होऊ शकतो, त्यामुळंच मंत्रिमंडळात स्थान मिळावं, यासाठी विद्यमान सरकारमधील शिवसेना-भाजपच्या आमदारांमध्येच मोठा संघर्ष सुरू असल्याची चर्चा आहे. दिलेला शब्द एकनाथ शिंदे पाळतील, त्यांच्या शब्दावर विश्वास आहे पण तरीही इच्छुक आमदारांच्या मनात धाकधूक आहे ती आमदार अपात्रतेचा निर्णय काय येतोय याविषयी, असंही एका इच्छुक आमदारानं नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलंय.