कल्याणच्या स्मशानभूमीला समस्यांनी ग्रासले; संबंधित प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी
X
कल्याणमध्ये रात्रीच्या वेळेस एका महिलेच्या अंत्यविधीसाठी नागरीकांना वीजे अभावी ताटकळत उभे राहावे लागल्याचा धक्कादायक प्रकार कल्याण पूर्व भागातील विठ्ठलवाडी परिसरातील मोक्षधाम स्मशानभूमीतून समोर आला आहे. खडेगोलवली परिसरातील एका वयोवृद्ध महिलेचा मृ्त्यू झाल्याने तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाईक स्माशानभूमीत गेले. स्मशानभूमीतील वीज पुरवठा खंडीत होता. स्मशानभूमीत एकच कर्मचारी उपलब्ध होता. त्याला विचारले असता त्याच्याकडे उत्तर नव्हते. लोकांनी अंधारात महिलेच्या अंत्यविधीची प्रक्रिया सुरु केली. तब्बल अर्धा तासानंतर त्याठिकाणी एक व्यक्ती आली, त्याने विज पुरवठा सुरळित केला. या घटनेमुळे नागरीकांनी नाराजी व्यक्त केली आहे. समाजसेवक राहूल काटकर यांनी याबाबत तक्रार केली आहे. नागरीकांची होणारी गैरसोय दूर करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
सोबतच काटकर यांनी बोलताना म्हटले आहे की, या स्मशानभूमीत घाणीचे साम्राज्य पसरलेले असते, अंत्यविधीसाठीची लाकड ओली असता, कर्मचारी वेळेवर उपलब्ध नसतात, जे असतात त्यांच्याकडे नागरिकांच्या समस्येवर उत्तरं नसतात.जर प्रशासन नागरिकांकडून कररूपी पैसे गोळा करत असेल तर त्यांना सुविधा देखील मिळायला हव्यात, मात्र या स्मशानभूमीला समस्यांनी ग्रासले आहे, येत्या काळात जर संबंधित प्रशासने योग्य दखल घेतली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.