चीन ने भारताच्या हद्दीत एक पूर्ण गाव वसवलं, 100 घरांचं बांधकाम पूर्ण
X
चीन आणि भारत यांच्यामधील सीमावाद थांबण्याचं नाव घेत नाही. गेल्या काही वर्षामध्ये भारत आणि चीन या दोन देशामधील सीमावाद वाढलेला असताना चीन ने अरुणाचल प्रदेशात भारतीय हद्दीत प्रवेश करून एक संपूर्ण गाव वसवले आहे. या गावात 100 घरं बांधली आहेत. अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या वार्षिक अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.
हे गाव पूर्णपणे भारताच्या हद्दीत वसलेले आहे. NDTV ने काही महिन्यांपूर्वी या गावात बांधलेल्या घरांची उपग्रह प्रतिमा देखील प्रसिद्ध केली होती.
यूएस संरक्षण विभागाने दिलेल्या अहवालात म्हटलं आहे की, 2020 मध्ये पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना (पीआरसी) ने भारत आणि चीनमधील भागात 100 घरे बांधली आहेत. हा भाग तिबेट मधील स्वायत्त क्षेत्र आणि अरुणाचल प्रदेश दरम्यान आहे. ही घरं LAC च्या पूर्वेकडील सेक्टरमधील भागात बांधण्यात आली आहेत.
भारत चीन सीमावाद
गेल्या वर्षी जूनमध्ये पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये हिंसक चकमक झाली होती. यानंतर लष्करी चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या, पण तरीही सीमा वाद पूर्णपणे मिटलेला नाही.
चीन आणि भारत यांच्यामधील वादाचे मुख्य कारण म्हणजे सीमावर्ती भागात चीनकडून सातत्याने पायाभूत सुविधांचे काम सुरू आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतानेही सीमाभागात सैनिकांसाठी आवश्यक सुविधा आणि चांगले रस्ते वाढवले आहेत.
गलवानमधील चकमकीनंतर दोन्ही देशांनी एकमेकांवर LAC चे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, एकीकडे, चीन सीमा विवादाचा प्रश्न चर्चेद्वारे सोडवण्याचे नाटक करत आहे आणि दुसरीकडे LAC वर मोठ्या प्रमाणात बंकर, तोफखाना आणि लष्करी पायाभूत सुविधा तैनात करत असल्याचं उपग्रहांनी घेतलेल्या फोटोमधून समोर आलं आहे.
मोदी सरकार अडचणीत?
दरम्यान या गावाच्या बांधकामाबाबत बातम्या आल्या तेव्हाही प्रसारमाध्यमांनी आणि विरोधकांनी मोदी सरकारला याबाबत सवाल केला होता.
कुठं आहे हे गाव?
हे गाव अप्पर सुबनसिरी जिल्ह्यातील त्सारी चू नदीच्या काठावर वसलेले आहे. 1962 च्या भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या युद्धापूर्वी या नदीवर अनेक चकमकी झाल्या आहेत. हा भाग भारत आणि चीनमध्ये दीर्घकाळापासून विवादित आहे आणि लष्करी संघर्षाचे क्षेत्र आहे.
चीनचं बांधकाम...
चीनने या भागात एक छोटी लष्करी चौकी बांधली होती, पण 2020 मध्ये चीनने भारतीय हद्दीमध्ये संपूर्ण गाव वसवण्यास सुरुवात केली तसंच या भागात चीन रस्तेही बांधत आहे.
सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांदरम्यान सुरू असलेल्या लष्करी आणि राजकीय चर्चेनंतरही LAC वर आपला दावा करण्यासाठी चीन अशी कारवाई करत असल्याचे अहवालात म्हटले आहे.
गेल्या महिन्यात, ईस्टर्न आर्मीचे कमांडर इन चीफ मनोज पांडे म्हणाले होते की, चीन दोन हेतूने गावाचे निर्माण करत आहे. या गावात सर्वसामान्य लोक राहतील असं नाही तर या गावाचा वापर सैनिक करू शकतात. अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
चीन भारताच्या सीमेवर सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशात सतत बांधकाम करत आहे आणि तिबेटच्या प्रदेशातही अब्जावधी डॉलर्स खर्च करत आहे. तो येथे रेल्वे आणि रस्त्यांचे जाळे विणत आहे. अनेक गावं वसवत आहे.