मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आज रात्री ८ वाजता जनतेशी संवाद साधणार
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आज रात्री ८ वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत, कोरोना निर्बंधांमध्ये शिथीलता आणण्याबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे मोठी घोषणा करण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
X
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री आठ वाजता सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर राज्यातील २२ जिल्ह्यातील लावण्यात आलेल्या निर्बंधांमध्ये मुख्यमंत्र्यांनी शिथीलता दिली होती. मात्र ११ जिल्ह्यांमध्ये अजूनही निर्बंध कायम ठेवण्यात आलेले आहेत. दरम्यान आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे कोणत्या घोषणा करतात याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागलं आहे.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आज पुणे आणि इतर जिल्ह्यांमधील निर्बंधाबाबत मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे, सोबतच मुंबईमधील जनसामान्यांची लाईफलाइन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकलबाबत देखील ते निर्णय घेतील असा अंदाज व्यक्त होत आहे. कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेल्यांनी प्रवास करण्यासाठी मुभा मिळावी, अशी मागणी अनेक राजकीय, सामाजिक संघटनांनी केली आहे, रेल्वे प्रवासी संघटनेनं देखील याबाबत आक्रमक पवित्रा घेतल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे याबाबत आज मुख्यमंत्री काय बोलणार याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.
राज्यातील महत्वाच्या शहरांपैकी एक असलेल्या पुण्यात व्यापाऱ्यांनी कोरोना नियमांचे उल्लंघन करत दुकाने सुरू ठेवली आहे. दरम्यान राज्यातील हॉटेल व्यावसायिकांना देखील वेळ वाढवून देण्याची मागणी केली आहे. याबाबत देखील मुख्यमंत्री ठाकरे भाष्य करण्याची शक्यता आहे.
दरम्यान, उद्या (९ ऑगस्ट २१ ) टास्क फोर्सची बैठक होणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आज काय घोषणा करतात याकडे राज्यातील जनतेच्या नजरा लागल्या आहेत.