Mumbai: मुंबई मेट्रोच्या 2 लाइनवर ट्रायलला सुरुवात, गर्दी कमी होणार का?
X
राज्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर आलेल्या दुसऱ्या लाटेतही कडक निर्बंध असताना विकासाचा वेग मंदावला नाही. मुंबई शहराला दिशा आणि वेग देणाऱ्या नव्या पिढीच्या विचारांना प्रत्यक्षात उतरविण्यात आल्याने मेट्रोचं काम आखीव रेखीव आणि देखणे झाले आहे. कोरोनाचा धोका अजुनही टळला नाही. गाफील न राहता आयुष्याला ब्रेक लागणार नाही. याची दक्षता घ्या, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केले.
डहाणूकरवाडी ते आरे स्थानकादरम्यानच्या मेट्रो मार्गिकांच्या चाचणीचा शुभारंभ, पश्चिम द्रुतगती महामार्ग (टर्मिनल १ अणि २) येथील नियंत्रित प्रवेश भुयारी- उन्नत मार्ग प्रकल्पाचे भूमिपूजन, राजणोली उड्डाण पुल मार्गिका आणि दुर्गाडी पुलाच्या दोन मार्गिकांचा ई लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसुलमंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
पुण्यश्लोक अहिल्या देवी यांच्या जयंतनिमित्त त्यांना अभिवादन करून मुख्यमंत्र्यांनी भाषणाला सुरूवात केली. ते म्हणाले, आजचा कार्यक्रम हा या महानगराला दिशा आणि वेग देणारा आहे. वर्षभराहून अधिक काळ कोरोनाचे सावट राज्यावर आहे. मात्र, याकाळात उपचारांच्या सुविधा निर्माण करतानाच मुंबई सारख्या वेगवान महानगराचा विकासाचा वेग कमी होऊ दिला नाही. मुंबई वाढतेय तसा तिच्या विकासाचा वेगही कायम राखतोय, असेही त्यांनी सांगितले.
विविध पायाभूत आणि दळणवळणाच्या प्रकल्पांमुळे मुंबई जो वेग घेत आहे त्या प्रवासात मुख्यमंत्री म्हणून सहभागी होता आले असे सांगतानाच मुंबई मेट्रोच काम आखीव-रेखीव आणि देखणं झाले आहे. मेट्रोची स्थानके, कोच यासाठी नव्या पिढीच्या विचारांना प्रत्यक्ष कृतीची जोड दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मुंबई आधुनिकतेची कास धरणार शहर असलं तरी त्याला प्राचीनतेचा वारसा आहे. आगळवेगळ विविधतेनं नटलेल्या शहरात होत असलेली विकास कामे हे सांघीक यश असल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.
मुंबईच्या रस्त्यांवर वाहतुकीच्या गर्दीचा उल्लेख करून मुख्यमंत्री म्हणाले, कोरोना रोखण्यासाठी जे निर्बंध आहेत ते अजून उठवलेले नाही. गर्दी करू नका. कोरोनाचा धोका अजून संपलेला नाही गाफील राहीलो तर आयुष्याच्या वेगाला ब्रेक लागेल, असा इशारा देतानाच कोरोना काळात विकास कामांचा पुढचा टप्पा वेगाने पार पाडावा असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, उद्योगमंत्री सुभाष देसाई, अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक, मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख, मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, खासदार राहुल शेवाळे, आमदार झीशान सिद्दीकी आदी यावेळी उपस्थित होते.