मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मिळावं ही ठाम भूमिका - मुख्यमंत्री शिंदे
X
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथील अंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू होतं. या उपोषण ठिकाणी मुख्यमंत्री एकना शिंदे यांनी आज भेट दिली.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ज्युस घेत मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला दिली आहे.
दरम्यान मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मराठा समाजासाठी जरांगे पाटील यांचा लढा सुरू आहे. ज्यांचा हेतू चांगला आहे त्याला जनता आणि सरकारही पाठींबा देते. जालना येथे लाठीचार्जची घडलेली घटना दुर्दैवी आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही माफी मागितली आहे. मराठा समाज शिस्तप्रिय आहे. लाठीमारीची घटना दुर्दैवी असल्याचे सांगत गावकऱ्यांवरील गुन्हे तातडीने मागे घेणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली
ते पुढे म्हणाले की "सुप्रिम कोर्टाने आरक्षण रद्द करताना ज्या त्रुटी काढल्या त्यावर काम सुरू आहे. जी भावना मनोज पाटील यांची आहे, तीच सरकारची आहे. मराठा समाजाची फसवणूक करणार नाही. सरकार म्हणून आमची जबाबदारी आहे की, मराठा समाजाचं गेलेलं आरक्षण आणि टिकणारं आरक्षण मिळालं पाहिजे, ही ठाम भूमिका आहे. मनोजची तब्बेत बिघडू नये, यासाठी त्याने वैद्यकीय उपचार घेतले पाहिजेत. दोन-तीन दिवस तब्बेत चांगली कर; तब्बेत चांगली झाली की आंदोलन कर. सरकार देणारं आहे. मी देखील शेतकरी कुटुंबात जन्मलेलो आहे. मला तुमच्या भावनांची जाणीव आहे. माझे बाबा मराठा क्रांती मोर्चात सहभागी झाले होते, असेही शिंदे म्हणाले.
त्यानंतर जरांगे पाटील यांनी फळाचा रस घेऊन उपोषण मागे घेतले. यावेळी मुख्यमंत्री शिंदेंसह केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, उद्योगमंत्री उदय सामंत, रोहयो व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे आणि अर्जुन खोतकर आदी सरकारचे मंत्री आंदोलन स्थळी उपस्थित होते.