मुख्यमंत्री साहेब बोट दिलीत आता पूल, रस्त्याचा प्रश्न सोडवा
X
मोखाडा तालुक्यातील कुर्लोद येथील एका गरोदर मातेला लाकडाच्या ओंडक्यावरून तुंडुंब भरलेल्या नदीच्या प्रवाहातून प्रवास करावा लागल्याची घटना घडली. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला. अधिवेशनातही या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेची तत्परतेने दखल घेऊन नदीच्या प्रवाहातून येजा करण्यासाठी बोटची व्यवस्था करुन दिली आहे. या बोट मधून एका वेळेस आठ ते दहा जणांना प्रवास करता येणार आहे. तसेच प्रत्यक्षरित्या एनडीआरएफ च्या टीमने बोट चालवण्याचे प्रशिक्षण गावकऱ्यांना दिले आहे.
पूल नसल्याने एका नऊ महिन्याच्या आदिवासी गरोदर मातेला उपचारासाठी लाकडाच्या ओंडक्यावरून तुडूंब भरून वाहणाऱ्या नदीच्या प्रवाहातुन जीवघेणा प्रवास करावा लागल्याची घटना या गावात मंगळवारी २५ तारखेला घडली होती.
मोखाडा तालुक्यातील समस्यांच्या गर्तेत अडकलेले आदिवासी बहुल कुर्लोद हे गाव तसेच येथील आंबेपाडा शेंड्याचापाडा रायपाडा जांभुळपाडा हे दुर्लक्षित पाडे आहेत. यामधील शेड्याचापाडा येथे वास्तव्य करणाऱ्या सुरेखा लहू भागडे वय (२२वर्ष) या नऊ महिनेच्या गरोदर मातेला ताप उलट्यांचा त्रास सकाळी साडेदहा वाजता सुरु झाल्याने येथील गावकऱ्यांनी त्यांना लाकडाच्या डोलीतून
अक्षरश तुडुंब भरून वाहणाऱ्या नदीच्या प्रवाहातून पार करून त्यांनी त्या मातेला दवाखान्यात पोहचवले. या घटनेची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतल्याने आता कुर्लोद वाशियांची परवड थांबणार असून कुर्लोद वासियांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत. आम्हाला बोट तर दिली पण तातडीने येथील रस्ता व पुलाचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी येथील गावकऱ्यांनी केली आहे.