सोलापुरात हजारो शिवप्रेमींच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा
X
सोलापूर : "झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजींचा
चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा….!
शिवनेरीच्या सदरेवर भगवा झेंडा फडफडे.... झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजींचा ..!" या सुमंगल पाळणा गीताने अवघे आसमंत दुमदुमले.. माँसाहेब जिजाऊ, तानाजी मालुसरे यांचे वंशज व वीर माता, पत्नी, मुलींच्या विशेष उपस्थितीत आयोजिलेला श्री शिवजन्मोत्सवाचा दिमाखदार "पाळणा" सोहळा "याची देही याची डोळा" सोलापूर नगरीत हजारोंच्या संख्येने शिवभक्तांनी पाहिला.
यानिमित्ताने सोलापुरात जणू शिवकाळ अवतरला असल्याने प्रेरणादायी चित्र पहायला मिळाले. या पाळणा गीताने हजारो शिवभक्तांनी छत्रपती शिवरायांना मनोभावे मानवंदना दिली. 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवरायांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला. हा श्री शिवजन्मोत्सव सोहळा सोलापुरात उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. सोलापुरात मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात या शानदार सोहळ्याचे श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने नेटके नियोजन करण्यात आले होते.
सोलापूर शहरात रविवारी दि.18 फेब्रुवारी रोजी रात्री 10 वाजल्यापासूनच छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवभक्तांची गर्दी जमत असल्याचे पहायला मिळाले. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील अश्वारुढ पुतळ्याला शिवनेरी किल्याचे ऐतिहासिक असे शिवकालीन रुप देण्यात आले होते. मोठ्या संख्येने भगिनींनी जिजाऊंच्या वेशभूषेत सहभागी झाल्या होत्या. एकूणच या परिसरात जणू शिवकाळ अवतरला असल्याचे चित्र दिसून आले. संपूर्ण पुतळ्याच्या परिसराला आकर्षक अशी सजावट करण्यात आली होती. पुतळ्याच्या समोरच राजमाता जिजाऊंचा पुतळा आणि या पुतळ्याच्या समोरच पाळणा सजवण्यात आला होता. त्यात बाळशिवबांची मूर्ती ठेवण्यात आली होती. मध्यरात्री 11.50 वाजता सुरुवात झाली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पाळणा झुलवून या सोहळ्यास उत्साहात प्रारंभ झाला. महापालिका आयुक्त शितल तेली - उगले यांच्या हस्ते मनोभावे आरती करण्यात आली.
या पाळणा सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून सिंदखेड राजा येथील जिजाऊ माँ साहेबांच्या वंशज संगीताराजे शिवाजीराजे जाधवर, कोंढाणा किल्ला आपल्या तलवारीच्या जोरावर सर करणारे सरसेनापती तानाजी मालुसरे यांचे वंशज शीतल मालुसरे, रायबा मालुसरे, दुर्ग अभ्यासक प्रशांत साळुंखे, महापालिका आयुक्त शितल तेली - उगले यांच्यासह वीर पत्नी वर्षा लटके, देवकी हडपद, रेखा नावी, सुरेखा जयहिंद पन्हाळकर, कांताबाई भोसले, रत्नाबाई चांदोडे, सुषमा माने आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी हजारो महिलांनी एकमुखाने मंगल स्वरात "पाळणा गीत" गायले.....
"झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजींचा
झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजींचा
चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा…....
झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा
झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा…...
ढोल नगारे घुमुद्यात रे झळुद्यात चौघडे
शिवनेरीच्या सदरेवर भगवा झेंडा फडफडे
गडागडाचे चिरे हरपले सह्याद्रीचे कडे
बाळा तुझियासाठी मावळे मर्द मराठे खडे
आज उगवला सूर्य नभी नव्या नवलाईचा…..!"
या स्फूर्तीदायी आणि ऊर्जादायी पाळणा गीताने उपस्थित हजारो शिवभक्तांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले होते. गुलाब फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव, फटाक्यांची मनोहारी, नयनरम्य आतषबाजीने आकाश प्रकाशित झाले होते. यावेळी एकमेकांना मिठाई देऊन श्री शिवजन्मोत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यात आला.
श्री शिवजन्मोत्सवाचा नेत्रदीपक , ऊर्जादायी असा सोहळा झाला. हा सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी हजारो माता - भगिनींसह शिवभक्तांनी विराट गर्दी केली होती. भव्यदिव्य दिमाखदार असा सोहळा पार पडला. उत्साहात तरुणाई थिरकली. जनसागर या सोहळ्यासाठी लोटला होता. हाती भगवा झेंडा घेऊन शिवप्रेमी सहभागी झाले होते. "तुमचं आमचं नातं काय - जय जिजाऊ ,जय शिवराय", "शिवाजी महाराज की जय" यासह विविध घोषणांनी सारा परिसर दणाणून गेला होता. बाल मावळ्यांनी शिवकालीन वेशभूषेत मर्दानी खेळ सादर केले. सर्व जाती-धर्माचे मावळे आणि महिला भगिनी या सोहळ्याला उपस्थित असल्याने राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन या निमित्ताने घडले. शानदार असा सोहळा असंख्य शिवप्रेमींनी आपल्या मोबाईलमध्ये टिपला. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.