परमबीर सिंगच नं.१ : आरोपपत्र दाखल
X
सर्वोच्च न्यायालयाने अटक न करण्याची मुदत उद्या संपत असताना निलंबित पोलिस महानिरीक्षक परमबीर सिंग यांचा पाय खोलात जात आहे. अटकेत असलेला निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना 'नंबर एक' म्हणत त्यांच्यासाठी वसुली केली, असा दावा मुंबई पोलिसांनी खंडणीच्या एका प्रकरणातील आरोपपत्रात केला आहे.
आरोपपत्रात सविस्तरपणे परमबीर यांच्या कृष्णकृत्यांचा पाढा वाचण्यात आला आहे. वाझे यांच्या म्हणण्यानुसार वसुलीच्या रकमेपैकी ७५ टक्के रक्कम सिंग यांच्याकडे गेली आणि उर्वरित रक्कम त्यांनी ठेवली. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने शनिवारी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि अन्य तिघांविरुद्ध गोरेगाव उपनगरात दाखल झालेल्या खंडणीप्रकरणी आरोपपत्र दाखल केले. 1895 हून अधिक पानांचे आरोपपत्र मुख्य महानगर दंडाधिकारी एस.बी. भाजीपाले यांच्यासमोर दाखल करण्यात आले.
अॅट्रासिटी सह राज्यातील खंडणीच्या किमान पाच प्रकरणांमध्ये सिंग यांचे नाव असून या आठवड्याच्या सुरुवातीला त्यांना निलंबित करण्यात आले आहे.
एअआयर दाखल केल्यानंतर जवळपास ३६ जणांचे जबाब घेण्यात आले आहे. या प्रकरणातील आरोपींपैकी सुमित सिंग आणि अल्पेश पटेल जामिनावर बाहेर आहेत तर विनायक सिंग आणि रियाझ भाटी हे वॉन्टेड आरोपी आहेत. सचिन वाझेंनी परमबीर सिंग यांना "नंबर एक" म्हणत पैशांची वसुली केली, असे जबाब तीन ते चार साक्षीदारांनी केली, असं आरोपपत्रात म्हटलंय. तसेच वाझेंना अनेक हायप्रोफाईल प्रकरणांचा तपास करण्यास सांगण्यात आलं होतं. वाझे सिंग यांना थेट भेटून महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करायचे आणि या सगळ्यावरून ते सिंग यांच्या जवळचा असल्याचे दिसून येते, असा आरोपपत्रात उल्लेख आहे.
आरोपपत्रात म्हटले आहे की, सिंग वाझे व इतर आरोपींमार्फत क्रिकेट बुकी तसेच हॉटेल व बारमालकांकडून पैशांची मागणी करत असे आणि पैसे न दिल्यास त्यांना अटक करण्याची आणि त्यांच्या आस्थापनांवर छापे टाकण्याची धमकी द्यायचा. हे प्रकरण बिमल अग्रवाल यांच्या तक्रारीशी संबंधित आहे. या तक्रारीनुसार, रेस्टॉरंटवर दोनदा छापा न टाकण्यासाठी आरोपीने त्यांच्याकडून ९ लाख रुपये उकळले आणि त्यांच्यासाठी २.९२ लाख रुपये किमतीचे दोन स्मार्टफोन खरेदी करण्यास भाग पाडले. ही घटना जानेवारी २०२० ते मार्च २०२१ दरम्यान घडल्याचे पोलिसांनी यापूर्वी सांगितले होते. यानंतर सहा आरोपींविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
ईडीसमोर सचिन वाझेने दिलेल्या जबाबानुसार माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना नं.१ म्हणण्यात आलं होतं. या आरोपपत्रामधे आता परमबीर नं-१ ठरले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने अटक न करण्याची मुदत उद्या ६ डिसेंबर रोजी संपत असून त्यानंतर पोलिस निलंबित परमबीर सिंग यांना अटक करणार का? याकडे आता सर्वाचे लक्ष लागले आहे.