Supreme Court : नवीन संसद भवनावरील राजमुद्रा प्रकरणी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली
X
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या नव्या संसद भवनावरील अशोक स्तंभाचे उद्घाटन करण्यात आले होते. यावरून देशात नवा वाद निर्माण झाला होता. हा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहचला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाने नव्या संसद भवनावरील राजमुद्रा प्रकरणी दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळून लावली.
नव्या संसद भवनावर उभारण्यात आलेल्या अशोकस्तंभावरील सिंह हा आक्रमक दिसत असल्याचा दावा करत अॅड. अल्दानिश रीन आणि रमेश कुमार मिश्रा यांनी याचिका दाखल केली होती. त्यामुळे हे राष्ट्रीय चिन्ह कायदा 2005 चे उल्लंघन असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला होता. मात्र न्यायमुर्ती एमआर शाह आणि न्यायमुर्ती कृष्ण मुरारी यांच्या पीठाने ही याचिका फेटाळून लावली.
याचिकाकर्त्यांनी याचिकेत म्हटले की, अशोक स्तंभ तयार करताना राष्ट्रीय चिन्ह कायद्याचा विचार केला नाही. तसेच नव्या संसद भवनावर उभारण्यात आलेल्या अशोक स्तंभाच्या रचनेत बदल करण्यात आला आहे. त्यामुळेच अशोक स्तंभामध्ये केलेला बदल हा राष्ट्रीय चिन्ह कायदा 2005 चे उल्लंघन आहे, असे याचिकाकर्त्यांनी म्हटले होते.
याचिकाकर्त्यांनी नव्या संसद भवनावरील राजमुद्रेवरील सिंह आक्रमक असल्याचे सांगत केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायमुर्ती एम आर शहा आणि न्यायमुर्ती कृष्ण मुरारी यांनी म्हटले की, सेंट्रल विस्टाअंतर्गत नव्या संसद भवनाच्या इमारतीवर उभारण्यात आलेली सिंह हे राष्ट्रीय चिन्ह कायदा 2005 चे उल्लंघन नाही. तसेच न्यायमुर्ती एम आर शहा यांनी तोंडी टिपण्णी करताना म्हटले की, सिंह आक्रमक की शांत हा विचार व्यक्तीच्या मनावर अवलंबून आहे. त्यामुळे नव्या संसद भवनावरील अशोक स्तंभाच्या बांधकामासाठी कोणत्याही प्रकारचे राष्ट्रीय चिन्ह कायद्याचे उल्लंघन करण्यात आले नाही. तसेच राष्ट्रीय चिन्ह कायद्याचे उल्लंघन झाले असल्याचे तुमचे वैयक्तिक मत असल्याचे न्यायालयाने म्हटले. तसेच ही याचिका फेटाळून लावली.