राज्यात भाजप मनसे युती होणार? नितीन गडकरींनी घेतली राज ठाकरेंची भेट
मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टीका केली. त्यामुळे मनसेचे इंजिन भाजपच्या रुळावर येणार का? अशी चर्चा रंगली होती. त्यापार्श्वभुमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्याने भाजप मनसे युती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
X
राज ठाकरे यांनी मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टीका केली. मात्र या संपुर्ण भाषणात भाजपबद्दल अवाक्षरही काढले नाही. त्यामुळे राज ठाकरे भाजपचा अजेंडा रेटत असल्याची चर्चा होती. त्यातच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी शिवतर्थ येथे भेट घेतल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
मुंबई महापालिका निवडणूकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यातच नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर त्यांचे दाऊदशी संबंध असल्याचा आरोप करत भाजपने रान पेटवले होते. त्याचीच री ओढत राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. त्याबरोबरच भाजप नेते प्रसाद लाड यांनी मशिदींवरील भोंगे काढण्याची मागणी काही दिवसांपुर्वीच केली होती. त्यावरून राज ठाकरे यांनी भोंगे काढा अन्यथा त्या भोंग्यांच्या समोर मोठ्या आवाजात हनुमान चालिसा पठन करा, असे सांगितले. त्यामुळे राज ठाकरेंवर भाजपचा अजेंडा रेटत असल्याचा आरोप होत आहे. तर राज ठाकरेंना ईडीची नोटीस आल्यामुळे त्यांची भाषा बदलल्याची टीका विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये भाजपच्या नेत्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यामुळे भाजप मनसे युतीची अटकळ बांधली जात होती. त्यापार्श्वभुमीवर नितीन गडकरी यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. मात्र नितीन गडकरी यांनी मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यानंतर लगेच राज ठाकरे यांची भेट का घेतली? या भेटीचे कारण समजू शकले नाही.