Home > News Update > केंद्रीय मंत्री गडकरी, गोयलांचे राजीनामे घ्या: कॉंग्रेसची मागणी

केंद्रीय मंत्री गडकरी, गोयलांचे राजीनामे घ्या: कॉंग्रेसची मागणी

केंद्रीय मंत्री गडकरी, गोयलांचे राजीनामे घ्या: कॉंग्रेसची मागणी
X

भारतात नागपूर महानगर पालिकेपासून कोल इंडियापर्यंत स्कॅनिया बस आणि ट्रक कंपनीने पुरवलेल्या वाहनांच्या खरेदीमध्ये प्रचंड मोठा घोटाळा झाला असून यात, भ्रष्टाचार, लाच देणे आणि आर्थिक अनियमितता असे प्रकार झाले आहेत. मंत्र्यांच्या मुलीच्या लग्नासाठी लक्झरी बस भेट देणे तसेच अनेक गाड्यांचे चेसीस नंबर आणि नंबर प्लेट बदलून कोल इंडियाच्या उपकंपनीला नव्या गाड्या म्हणून विकल्याचा गंभीर प्रकार घडला असून त्याचे संपूर्ण पुरावे स्कॅनिया कंपनीच्या अंतर्गत चौकशीत समोर आले आहेत. या कोट्यवधींच्या घोटाळ्याची आम्ही केंद्रीय दक्षता आयोगाकडे तक्रार केली असून हा प्रकार देशाच्या सुरक्षेसाठी धोकादायक असून याची NIA मार्फत चौकशी करावी अशी मागणी काँग्रेस नेते डॉ. संजय लाखे पाटील यांनी केली आहे.

गांधीभवन येथे पत्रकारपरिषदेला संबोधित करताना डॉ. लाखे पाटील यांनी पुराव्यासह या घोटाळ्याचा पर्दाफाश केला. स्वीडीश शोध वृत्त माध्यम कंपनी SVT, जर्मन सरकारी माध्यम कंपनी ZDF आणि भारतीय Confluence Media यांच्या संयुक्त पत्रकारांच्या टीमने या घोटाळ्याचा तपास करून त्याची पाळेमुळे शोधून जनतेसमोर ठेवली आहेत. यासंबंधीचे वृत्त प्रसिद्ध झाल्यावर स्कॅनिया या बस व वाहन उत्पादक कंपनीचे जागतिक मुख्य कार्यकारी अधिकारी हेन्री हेनरिक्सन यांनी रॉयटर्स या जगप्रसिद्ध वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत घोटाळा झाल्याची स्पष्ट कबुली दिली असून ते म्हणतात की, "उपलब्ध पुरावे हे गैरव्यवहार झाल्याचे सिद्ध करण्यासाठी पुरेसे असून आमच्या अनेक वर्षांच्या व्यावसायिक नितीमुल्यांचा भंग करणारे आहेत. ज्यात लाच देणे, सहकारी आणि वितरक यांच्या मार्फत गैरव्यवहार याचाही यात समावेश असून त्यामुळे आम्ही भारतातील आमचा उत्पादन प्रकल्प बंद केला आहे."

या घोटाळ्याची व्याप्ती खूप मोठी असून नागपूर महानगरपालिका, केंद्र सरकारचा भूपृष्ठ परिवहन विभाग, कोळसा मंत्रालय आणि भाजप शासित सात राज्य सरकारे यात गुंतली आहेत. त्यामुळे केंद्रीय दक्षता आयोगाने या प्रकरणाची तात्काळ चौकशी केली पाहिजे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री आणि कोळसा मंत्री यांच्याविरोधात केंद्रीय दक्षता आयोगाकडे आम्ही तक्रार नोंदवली असून त्याचा क्रमांक 174407/2021/Vigilance/2 आहे.

स्कॅनिया या बस कंपनीकडून नागपूर महानगरपालिकेने मोठ्या प्रमाणावर इथेनॉलवर आधारित बसेस खरेदी केल्या होत्या तसेच डिझेल वाहनेही खरेदी केली आहेत. या प्रकरणात भारतातील एका मोठ्या मंत्र्यांला लाच म्हणून सर्व सोयीसुविधायुक्त इंपोर्टेड लक्झरी बस भेट दिल्याचे आणि त्या बसमध्ये मंत्र्याच्या मुलीच्या लग्नासाठी आवश्यक ते बदल करून देण्याची तयारी दर्शवली होती, हे कंपनीच्या अंतर्गत इमेल संभाषणातून उघड झाले आहे. इतकेच नव्हे तर या जगप्रसिद्ध कंपनीचे सिईओ सुद्धा या मंत्र्यांच्या मुलीच्या राजेशाही विवाह सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयाने यासंदर्भात खुलासा करताना, सदर व्यवहाराचा आणि मंत्री महोदयांचा काहीही संबंध नाही असे म्हटले आहे पण त्याच खुलाशामध्ये त्यांनी या घोटाळ्याची अप्रत्यक्ष कबुली देत "नितीन गडकरी यांनी नागपूर महानगरपालिका आणि स्कॅनिया कंपनीबरोबर सामंजस्य करार करण्यासाठी पुढाकार घेऊन या व्यवहाराला प्रोत्साहन दिल्याचे नमूद केले आहे. गडकरींनी घेतलेल्या निर्णयाचा परिपाक म्हणूनच नागपूर शहरात इथेनॉलवर चालणा-या बसेस सुरु झाल्या असे त्यांनी म्हटले आहे."

या बससेवेचा शुभारंभ होण्यापूर्वी या बसेस नितीन गडकरींच्या पूर्ती पॉवर एन्ड शुगर लिमीटेड कारखान्याच्या आवारात पार्क केल्याचे दिसून आले होते आणि त्याची छात्राचित्रेही वर्तमानपत्रात छापून आलेली आहेत. नागपूर महानगरपालिकेच्या इथेनॉलवर चालणा-या 55 बसेस ज्या अचानक स्कॅनिया कंपनीला परत दिल्या आणि कदाचित त्यांचे चेसीस नंबर बदलून इतरत्र खपवण्यात आल्या असण्याची दाट शक्यता आहे. तसेच मंत्र्याला दिलेली ती लक्झरी बसही कुठे आहे याची माहिती नसल्याचे कंपनी सांगत असून या बसचाही चेसीस नंबर बदलून कोणाला विक्री केली आहे का याची चौकशी होणे गरजेचे आहे.

स्कॅनिया कंपनीच्या अनेक ट्रक आणि वाहनांचे चेसीस नंबर आणि नंबर प्लेट बदलून या गाड्या नविन आहेत असे भासवून केंद्र सरकारच्या मालकीच्या BCCL या कोळसा कंपनीला विकण्यात आल्या. चेसीस नंबर आणि नंबर प्लेट बदलून गाड्यांची खरेदी-विक्री करणे गंभीर असून देशाच्या सुरक्षेसाठी धोकादायक आहे. त्यामुळे या प्रकरणाची NIA मार्फत चौकशी करण्याची मागणीसुद्धा डॉ. लाखे पाटील यांनी केली आहे.

'ना खाऊंगा, ना खाने दुंगा' म्हणणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील नितीन गडकरी व पियुष गोयल या दोन मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत. या भ्रष्टाचाराची निष्पक्ष चौकशी होण्यासाठी त्यांना मोदींनी पदावरून दूर करावे, अशी मागणीही लाखे पाटील यांनी केली आहे.


Updated : 12 March 2021 5:28 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top