केंद्र सरकारने या सहा पिकांच्या हमी भावात केली वाढ
X
केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. रब्बी पिकांच्या हमी भावात MSP वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. एकूण सहा रब्बी पिकांची किमान आधारभूत किंमत 2 टक्क्यावरून 7 टक्के करण्यात आली आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहॆ.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पार पडलेल्या बैठकीत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारने 35,000 कोटी रुपयांच्या ‘पीएम अन्नदाता आय संरक्षण अभियान’ला देखील मंजुरी दिली आहे. तसेच यावेळी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये ३ टक्के वाढ मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५० टक्क्यांवरून, आता ५३ टक्के करण्यात आला आहे.
केंद्र सरकारने रब्बी हंगामातील पिकांसाठी 24,475 कोटी रुपयांचे नॉन-युरिया खतांवर अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच गहू आणि मोहरीसह 6 रब्बी पिकांच्या MSP मध्ये वाढ करण्यात आली आहे. सरकारने 2025-26 या आर्थिक वर्षासाठी गव्हाच्या किमान आधारभूत किमतीत 150 रुपयांनी वाढ करून 2,425 रुपये प्रति क्विंटल करण्याचा निर्णय घेतला. त्याचप्रमाणे मोहरीच्या MSP मध्ये प्रति क्विंटल 300 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. हरभऱ्याच्या MSP मध्ये 210 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
काय आहॆ पीएम अन्नदाता आय संरक्षण मोहीम -
पीएम अन्नदाता आय संरक्षण मोहिमेसाठी सरकारने 35,000 कोटी रुपये मंजूर केले आहेत. देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या उद्देशाने सरकारने ‘पीएम अन्नदाता आय संरक्षण अभियान’ (पीएम-आशा) साठी 35,000 कोटी रुपये मंजूर केले.माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर निर्णयाची माहिती दिली. सरकारच्या या निर्णयामुळे डाळी, तेलबिया आणि इतर आवश्यक कृषी व बागायती वस्तूंच्या उत्पादनात स्वावलंबन वाढेल, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल आणि ग्राहकांच्या हिताचे रक्षण होईल, असे दावा वैष्णव यांनी केला आहॆ.