Home > News Update > एकलव्य फाऊंडेशन इंडियातर्फे सावित्री उत्सव साजरा

एकलव्य फाऊंडेशन इंडियातर्फे सावित्री उत्सव साजरा

एकलव्य फाऊंडेशन इंडियातर्फे सावित्री उत्सव साजरा
X

नागपूर: एकलव्य फाऊंडेशन इंडियाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. नागपूरच्या गोरेवाडा येथील सेंटरवर आयोजित या कार्यक्रमात संस्थेचे सह-संस्थापक राजू केंद्रे तसेच सह-संस्थापक स्मिता ताटेवार, शिक्षक प्रीतम कुमार दास आणि अश्विनी मेश्राम मॅडम यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले.

या विशेष दिनी एकलव्य फाऊंडेशन इंडियाच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटनही याच सेंटरवर करण्यात आले, ज्यामुळे कार्यक्रमाला अधिक महत्त्व प्राप्त झाले. कार्यक्रमात संस्थेच्या ७५ पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.


कार्यक्रमादरम्यान, विद्यार्थ्यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यात गाणी, पथनाट्ये, भाषणे, संवाद आणि निबंध स्पर्धांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी राजकीय, शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक स्थितीवर आपले विचार परखडपणे मांडले.

प्रिया वाघ या विद्यार्थिनीने सादर केलेल्या अत्याचारग्रस्त दलित महिलेच्या एकांकिकेने उपस्थितांचे मन हेलावून टाकले आणि अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले. पुरुषसत्ताक मानसिकतेला प्रश्न विचारणारी ही एकांकिका विशेष प्रभावी ठरली. “साऊ शिकली म्हणून आम्ही शिकलो” या पथनाट्याचे सादरीकरण माहेश्वरी, महेश, मलिक दास, संदीप कौर, दुर्गा, सोपान आणि चेतन यांनी अत्यंत प्रभावीपणे केले.

यासोबतच नावेद, अजय कसबे, आस्था, सुशील, शांतनू आणि अनेक विद्यार्थ्यांनी दिमाखदार भाषणे दिली, ज्यामुळे कार्यक्रमात एक जोशपूर्ण वातावरण निर्माण झाले. अक्षय, विजय आणि प्रदीप यांच्या सुमधुर गाण्यांनी कार्यक्रमात आणखी रंगत भरली.

विशेष म्हणजे, तीन विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंच्या सहकारी शिक्षिका फातिमा शेख यांची भूमिका साकारली, ज्यामुळे कार्यक्रमाला एक जिवंत अनुभव प्राप्त झाला.

“साऊ पेटती मशाल, साऊ आग ती जलाल” हे प्रेरणादायी गीत विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे सादर केले.


मध्य प्रदेश, बिहार, ओडिशा, महाराष्ट्र आणि देशाच्या विविध भागातून आलेल्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात उत्साहाने सहभाग घेतला. या आगळ्या-वेगळ्या पद्धतीने सावित्रीबाई फुलेंना अभिवादन करत हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. निखिल मुडघरे यांनी सर्वांचे आभार मानले....

Updated : 3 Jan 2025 5:48 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top