..मर्द असाल तर मला अडवून दाखवा,नाराय़ण राणे यांचा शिवसैनिकांना इशारा
X
काही दिवसांपासून हनुमान चालिसा पठनावरुन महाराष्ट्रात राजकीय नाट्य सुरू आहे. आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी आपण मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठण करणार असल्याची घोषणा केल्यानंतर हा वाद आणखीनच टोकाला गेला होता. राणा दाम्पत्याविरोधात शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेैनिकांनी थेट राणा यांचे मुंबईतील खार इथले घर गाठले आणि तिथेच आंदोलन सुरू केले. त्यानंतर राणा दाम्पत्यांनी आंदोलन मागे घेतलं.या प्रकरणावरुन आता मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन नवनीत राणा आणि रवी राणा यांची पाठराखण केली, तसेच ठाकरे सरकारवर ताशेरे ओढले आहेत. नवनीत राणा यांना ठाकरे घाबरल्याने शिवसैनिकांना पाठवून दहशत निर्माण केल्याचा आरोप राणे यांनी केला आहे.
"हिंमत असेल तर शिवसैनिकांनी मला अडवून दाखवावे,मातोश्रीसमोर सव्वा दोनशे आणि राणांच्या घरासमोर १३५ शिवसैनिक जमा आहेत.जर राणांना पोलिसांनी त्यांच्या सुरक्षेत बाहेर काढले तर ठीक,नाहीतर मी स्वत: जाईन आणि राणा यांना बाहेर काढेन" असे आव्हान राणे यांनी शिवसेनेला दिले आहे. राणे म्हणाले की, राज्यातील वातावरण खराब करण्यास शिवसेना जबाबदार असून, खोटे आरोप करून राजकारण केलं जात आहे. असा आरोप केला आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदासाठी हिंदुत्व सोडल्याची टीकाही यावेळी राणे यांनी केली आहे.