परमबीर सिंहांच्या जवळकीमुळे बिल्डरने आपल्या जुन्या भागीदारावर दाखल केले १८ गुन्हे
X
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह काही पोलीस अधिकाऱ्यांवर मुंबईत खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी संजय पुनामिया याच्यासह काही जणांना पोलिसांनी अटकही केली आहे. पण आता या प्रकरणी दाखल झालेल्या FIR मधून धक्कादायक माहिती समोर येऊ लागली आहे. परमबीर सिंह हे ठाण्याचे पोलीस आयुक्त असताना त्यांनी खंडणीसाठी मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. एवढेच नाही तर परमबीर सिंह यांचा बिल्डर मित्र संजय पुनामिया याने सिंह यांच्या जवळीकीचा फायदा उचलत आपल्यावर विविध पोलीस ठाण्यांमध्ये १८ गुन्हे दाखल केले होते, असा आरोप तक्रारदार श्याम सुंदर अग्रवाल यांनी केला आहे.
अग्रवाल हे संजय सुनामिया यांचे व्यावसायिक भागीदार होते. पण नंतर त्यांच्यात वाद झाला होता. यानंतरच संजय पुनामिया याने आपल्याला त्रास देण्यास सुरूवात केली आणि त्याला परमबीर सिंह यांनी मदत केली असा आरोप श्याम सुंदर अग्रवाल यांनी केला आहे. २०१७मध्ये ठाणे पोलिसांनी श्याम सुंदर अग्रवाल यांना नागरी कमाल जमीन धारणा कायद्यांतर्गत खोटी कागदपत्रं जमा केल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. अग्रवाल यांच्या अटकेनंतर पुनामिया याने मनोज घाटकर या व्यक्तीला सेटलमेंट करण्यासाठी आपला पुतण्या शरद याच्याकडे पाठवले. त्यानंतर घाटकर शरदला परमबीर सिंग यांच्या बंगल्यावर घेऊन गेला. तिथे मनोज घाटकर याने आम्हा दोघांना मोक्का अंतर्गत तुरुंगात टाकण्याची धमकी देत २० कोटींची खंडणी मागितली. त्यानंतर ९ कोटी रुपये संजय पुनामियाला दिले. तसेच त्याचा मित्र सुनील जैन यांच्या नावावर भाईंदरमधील मालमत्ता करुन द्यावी लागली, असाही आरोप अग्रवाल यांनी आपल्या तक्रारीमध्ये केला आहे.
त्यानंतर २०२१मध्ये परमबीर सिंग मुंबईचे पोलीस आयुक्त असताना संजय पुनामिया याने अग्रवाल यांच्यावर आरोप करत तक्रार दाखल केली. छोटा शकील मार्फत अग्रवाल यांनी आपल्याला धमकी दिल्याचा आरोप पुनामिया याने केला. त्यानंतर अग्रवाल यांच्या विलेपार्ले, भाईंदर इथल्या घरावर धाडी टाकण्यात आल्या आणि त्यानंतर नंदकुमार गोपाळे, आशा कोरके आणि डीसीपी अकबर पठाण यांनीही आपल्याकडून ५० लाखांची खंडणी घेतल्याचा आरोप अग्रवाल यांनी केला होता.