बौद्ध भिक्षुकाला अपमानजक वागणूक...भिक्षुकांचा एल्गार...
X
ठाणे शहरातील बौद्ध भिक्षूंना त्रास देणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात आज सर्व बौद्ध भिक्षूकांनी एकत्र येत निषेध आंदोलन केले. मागील ४ वर्षांपासून काही व्यक्ती सोशल मीडियाच्या माध्यमातून तसेच बौद्ध विहारांमध्ये येऊन बौद्ध भिक्षूकांना त्रास देत आहेत.
सोशल मिडीयाच्या माध्यमातून एखाद्याची बदनामी करण्याचे जणू पेवच फुटले असल्याचे पाहायला मिळत आहे. सोशल मिडीयाचा चांगल्या कामासाठी जसा उपयोग करता येतो तसंच त्यांचा वाईट कामासाठी काही समाजकंटक वापर करताना दिसून येत आहेत. अशीच एक घटना ठाणे इथे घडल्याचे पाहायला मिळाले. बौद्ध विहारामध्ये राहणाऱ्या बौद्ध भिक्षूकांना काही समाजकंटक हे सोशलमिडीयाच्या माध्यमातून गेल्या ४ वर्षापासून त्रास देत आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी यासाठी ठाण्यातील बौद्ध भिक्षूकांनी निषेध आंदोलन केले. तर त्रास देणाऱ्या व्यक्तींना काँग्रेसचा पाठिंबा असल्याचे बौद्ध भिक्षुकाने सांगितले. आणि यातील काहीजण काँग्रेसचे पदाधिकारी असल्याचा देखील बौद्ध भिक्षूकानी सांगितले.
सोशल मिडीयाचा वापर करुन बदनामी करणाऱ्या समाजकंटकांवरती लवकरात लवकर कारवाई व्हावी अशी मागणी बौद्ध भिक्षुकांनी केली आहे. बौद्ध भिक्षुक हे शांतता प्रिय असल्यामुळे त्यांनी कोणत्याही प्रकारचं चुकीचं पाऊल उचलेले नाही. यासाठी भिक्षूकांनी स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये देखील रितसर तक्रार दाखल केली आहे. मात्र अद्याप त्याची कोणतीही दखल पोलीसांनी घेतलेली नाही. त्यामुळे आज सर्व बौद्ध भिक्षूकांनी ठाण्यातील आंबेडकर चौक या ठिकाणी घोषणाबाजी करुन आंदोलन केले. आणि या सर्व प्रकारावर पोलीसांनी लवकरात लवकर लक्ष घालून कारवाई करण्याची मागणी बौद्ध भिक्षुकांनी यावेळी केली.