लोकप्रतिनिधींवर बॉम्ब हल्ला करा, BRS चे नेते राजू तोडसाम यांचा इशारा
X
भारत राष्ट्र समिती अर्थात BRS या तेलंगणातील सत्ताधारी पक्षानं महाराष्ट्राच्या राजकारणात आपली पाळमुळं रोवायला सुरूवात केलीय. महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पक्षाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतील नेत्यांनी बीआरएसमध्ये प्रवेश करत पक्षसंघटन वाढवायला सुरूवात केलीय. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा आणि विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर शेतकरी, दलित-मागास, वंचित घटकांना साद घालायलाही BRS च्या नेत्यांनी सुरूवात केलीय.
महाराष्ट्रात यावर्षी सरासरी पेक्षा कमी पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांसह सामान्यांचं आर्थिक गणित बिघडणार आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी या मागणीसाठी बीआरएसचे नेते तथा माजी आमदार राजू तोडसाम यांनी आज यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी इथं शेतकरी, शेतमजूरांसह मोर्चा काढला होता. शेतकऱ्यांच्या नुकसानीकडे कुठलाही लोकप्रतिनिधी लक्ष द्यायला तयार नाही. त्यामुळं जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींवर बॉम्ब हल्ले करण्यासाठी तयार राहा, त्याशिवाय तुमच्याप्रश्नांकडे त्यांचं लक्ष जाणार नाही, असं आवाहनच राजू तोडसाम यांनी केलंय. तोडसाम यांच्या आवाहनानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडालीय.