आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट
कोणतेही वैद्यकीय शिक्षण नसताना राज्यात रुग्णांवर उपचार करणारे अनेक बोगस डॉक्टर सक्रीय असल्याचे सांगितले जाते. त्यातच राज्यातील बोगस डॉक्टरांसंबंधी धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या जिल्ह्यातच तब्बल 103 बोगस डॉक्टर आढळून आले आहेत. त्यामुळे आरोग्य क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
X
वैद्यकीय शिक्षण न घेता रुग्णांवर उपचार करणारे अनेक बोगस डॉक्टर सध्या राज्यात सक्रीय आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री असलेल्या राजेश टोपे यांच्या जालना जिल्ह्यात बोगस डॉक्टरांनी मोठा हैदोस घातला आहे. त्यातच संपुर्ण जिल्हाभरात तब्बल 103 बोगस डॉक्टर आढळून आले आहेत. त्यामुळे चक्क आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याच जिल्ह्यात बोगस डॉक्टर आढळून आल्याने आरोग्य क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना आदेश देत जालना जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. तर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांसह खुद्द पालकमंत्री आणि राज्याचे आरोग्यमंत्री असलेल्या राजेश टोपे यांनाही बोगस डॉक्टरांचा शोध घेण्यासंबंधी उशीराने जाग आल्याचे दिसून आले. त्यामुळे जिल्हाधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी जालना जिल्ह्यात शोध मोहिम सुरू केली. त्यामध्ये तब्बल 103 डॉक्टर हे बोगस असल्याचे आढळून आले. तर 267 नोंदणीकृत डॉक्टर आढळून आले आहेत. तर 169 डॉक्टरांची नोंदणी झालेली नाही.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या घनसांगवी मतदारसंघात 9 बोगस डॉक्टर आढळून आले आहेत. तर जालना तालुक्यात सर्वाधिक 25 डॉक्टर बोगस आहेत. त्यापाठोपाठ भोकरदनमध्ये 24,जाफ्राबादमध्ये 17,बदनापूरमध्ये 10,परतूरमध्ये 8,अंबडमध्ये 6,मंठ्यात 4 डॉक्टर बोगस निघाले आहेत. जालना जिल्ह्यात इतके डॉक्टर बोगस असताना आतापर्यंत आरोग्य यंत्रणा काय करत होती? याबरोबरच या डॉक्टरांची आरोग्य विभागासोबत सेटलमेंट आहे असा देखील सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.