किरीट सोमय्या यांच्यावर मुंबई महापालिकेची कारवाई
X
भाजप चे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या हे गेल्या काही काळापासुन सातत्याने महाविकास आघाडी सरकारवर टीका करत आहेत. ठाकरे सरकारवर टीका करण्याची एकही संधी ते सोडताना दिसत नाहीत. अशातच दसऱ्याच्या निमित्ताने त्यांनी त्यांच्या नीलम नगर येथील कार्यालयाबाहेर भ्रष्टाचाराचा रावणरूपी दहनाचा कार्यक्रम संध्याकाळी शुक्रवारी साडेचारच्या दरम्यान ठेवला होता. परंतू मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी हा पुतळा आता हटवला आहे. यावेळी किरीट सोमय्यांनी पोलिस आणि पालिका अधिकाऱ्यांशी वाद घातला.
यावेळी किरीट सोमय्या यांचा मुलगा आणि नगरसेवक नील सोमय्या यांची पोलीस आणि महापालिका अधिकाऱ्यांसोबत झटापट देखील झाली. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आपल्याला धक्काबुक्की केली असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. अखेर घटनास्थळावरून हा पुतळा महापालिका अधिकारी तसेच पोलिसांनी हटवला. परंतु कुठल्याही परिस्थितीत आपण रावण दहनाचा कार्यक्रम करणार असल्याचे आव्हान किरीट सोमय्या यांनी दिले आहे. तसेच दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी देखील किरीट सोमय्या यांनी माध्यमांसमोर केली आहे.