नारायण राणेंच्या अडचणी वाढल्या, मुंबई महापालिकेची जुहू बंगल्याप्रकरणी राणेंना नोटीस
मुंबई महापालिकेने जुहू येथील बंगल्याच्या तपासणीसाठी नारायण राणे यांना नोटीस पाठवली आहे.
X
जुहू येथील सातमजली 'आदिश' बंगला प्रकरणी मुंबई महापालिकेच्या अंधेरी पश्चिम येथील नगरसहायक अभियंता यांनी गुरूवारी केंद्रीय मंत्री यांना नोटीस पाठवली आहे.
मुंबई महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर मुंबईत भाजप विरुध्द शिवसेना संघर्ष रंगला आहे. तर जुहू येथील सातमजली आदिश बंगल्याप्रकरण नारायण राणे यांना मुंबई महापालिकेने नोटीस पाठवली आहे. राणे यांनी बंगला बांधताना कोस्टल रेग्युलेशन झोनचे उल्लंघन करत त्याचा बेकायदेशीर वापर करत असल्याची तक्रार संतोष दौंदर यांनी दाखल केली होती.
त्यानुसार महापालिकेचे नगर सहायक अभियंता अंधेरी पश्चिम यांनी नारायण राणे यांना नोटीस पाठवत बंगल्याची तपासणी करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. मात्र महापालिकेने निनावी नोटीस पाठवली आहे. मात्र यापुर्वीही मुंबई महापालिकेने राणे यांच्या बंगल्याची चौकशी केली होती. तेव्हा त्यांना काहीही बेकायदेशीर आढळले नाही. मग पुन्हा नोटीस का? असा प्रश्न राणे यांनी विचारला आहे.
संतोष दौंदर यांनी 2017 मध्ये राणे यांच्या जुहू येथील बंगला प्रकरणी तक्रार दाखल केली होती. तर प्रदीप भालेकर यांनी राणे यांनी अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर मुंबई महापालिकेने तपासणीसाठी नोटीस पाठवल्याने राणेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
तसेच नारायण राणे यांना नोटीस पाठवून नगर सहायक अभियंता अंधेरी पश्चिम यांनी सांगितले आहे की, नारायण राणे यांच्या जुहू येथील आदिश बंगल्यामध्ये महापालिकेचे अभियंता, त्यांचे सहायक अभियंते आणि कर्मचारी येऊन तपासणी करणार आहेत. त्यामध्ये आदिश बंगल्याचे फोटोग्राफ घेण्यासह त्याची मोजणी करण्यात येणार आहे. त्यावेळी बंगल्याचे मालक असलेल्या नारायण राणे यांनी तेथे उपस्थित असणे आवश्यक आहे. तर मुंबई महापालिका अधिनियम सेक्शन 68 मधील 488 नुसार परिसराची तपासणी 18 फेब्रुवारी रोजी करण्यात येणार आहे, अशी माहिती नोटीसमध्ये दिलेली आहे.
नारायण राणे यांनी 2011 मध्ये बंगल्याचे बांधकाम सुरू केले. तर 2012 मध्ये आदिश बंगल्याचे काम पुर्ण केले. मात्र नारायण राणे यांनी कोस्टल रेग्युलेशन झोन चे उल्लंघन केल्याचा आरोप करत हा बंगला वादग्रस्त ठरला आहे.