राष्ट्रध्वजावर भाजपचा झेंडा, राष्ट्रवादीची भाजपवर टीका
भाजपचे ऱाष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी कल्याण सिंह यांना श्रध्दांजली वाहताना राष्ट्रीय ध्वजावर भाजपचा झेंडा अंथरल्याने राष्ट्रवादीने भाजपवर टीका केली आहे.
X
उत्तरप्रदेश चे माजी मुख्यमंत्री तसेच भाजप चे ज्येष्ठ नेते कल्याण सिंह यांचे शनिवारी रात्री निधन झाले. त्यांच्या निधनानंतर सर्वपक्षीय नेत्यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देत श्रध्दांजली वाहिली. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील कल्याण सिंह यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनाकरीता उपस्थित राहिले. यावेळी भाजपचे ऱाष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी राष्ट्रीय ध्वजात गुंडाळलेल्या कल्याण सिंह यांच्या पार्थिवावर भाजपचा झेंडा श्रध्दांजली देताना आंथरला. त्यानुळे आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने ट्विटरवरून भाजपवर टीका केली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसने त्यांच्या ट्विटर हॅंडल वरून भाजपवर घाणाघाती टीका केली आहे. "आधी देश, मग पक्ष, शेवटी स्वतः" अशी घोषणा देणाऱ्या भाजपने देशाला आता पक्षाच्या झेंड्याखाली गुंडाळून ठेवलं. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांच्या निधनानंतर त्यांना अभिवादन करत असताना भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी चक्क भारताच्या ध्वजावर भाजपचा झेंडा अंथरला.
विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीतच भारतीय ध्वजाचा हा अवमान झाला. प्रोटोकॉलप्रमाणे भारतीय ध्वजावर अन्य कोणताही ध्वज ठेवता येत नाही. 'नेशन फर्स्ट' ही घोषणा जनतेला फसवून केवळ स्वतःचा आणि स्वतःच्या पक्षाचा उद्धार करणाऱ्यांनीच आज उघडी पाडली. राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपचा निषेध व्यक्त करत आहे.", असे म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेसने भाजपवर टीका केली आहे.