'मातोश्री'वर निघणारा मशाल मोर्चा भाजप पुरस्कृत मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांचा आरोप
X
मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानं राज्यातील मराठा समाजामध्ये नाराजीची भावना आहे. सरकारने न्यायालयात योग्य बाजू मांडली नाही. असा देखील सूर पाहायला मिळत आहे. राज्य सरकार जोपर्यंत हालचाल करत नाही तोपर्यंत राज्यसरकार विरोधात आक्रमक भूमिका घेण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाकडून देण्यात आला आहे.
मात्र, आता याच मराठा क्रांती मोर्चात राजकारण घुसल्याचं दिसून येत आहे. मराठा क्रांती मोर्चाचं आंदोलनं भाजप पुरस्कृत असल्याचा आरोप खुद्द मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकाने केला आहे. मराठा आरक्षण आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी 7 नोव्हेंबर ला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर मशाल मोर्चा काढण्यात येणार असल्याचं मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रमेश केरे यांनी बुधवारी औरंगाबाद येथे पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे.
मात्र 24 ऑक्टोंबर रोजी झालेल्या राज्यव्यापी बैठकीत मशाल मोर्चा काढण्याच्या कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रवींद्र काळे यांनी केला आहे. तर 'मातोश्री' वर निघणार मशाल मोर्चा भाजप पुरस्कृत कार्यक्रम असल्याचं सुद्धा त्यांनी म्हंटलं आहे.
नेमके काय आरोप केले आहे 'काळे' यांनी!
काळे यांनी काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, 24 ऑक्टोबर रोजी झालेल्या राज्यव्यापी बैठकीत मातोश्रीवर मशाल मोर्चा काढण्याचा कुठलाही निर्णय घेतला नसतांनाही, अचानक निर्णय जाहीर होतातच कसे? तसंच औरंगाबादमध्ये रमेश केरे हे एकटे मशाल मोर्चा बाबतचे आंदोलन जाहीर करातात. या मागची नेमकी राजकीय काय खेळी आहे. हा भाजपा पुरस्कृत आयोजित कार्यक्रम आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे.
जिल्हातील कुठलेही समन्वयक सोबत नसतानाही रमेश केरे निर्णय कसा घेऊ शकतात? त्यामुळे यांचा बोलविता धनी कोण आहे? हे त्यांनी स्पष्टपणे सांगावं असे आमचं आवाहन आहे. राज्यव्यापी निर्णायक बैठकीत निर्णय न घेता अचानक कुठलाही निर्णय घोषित करतात. समाजाची दिशाभुल करु नका. अन्यथा तुमचाही समाचार घेतल्या शिवाय आम्ही राहणार नाही, असा इशारा काळे यांनी दिला आहे.
मराठा क्रांती मोर्चाच्या स्थापनेत काळे यांचा मोठा सहभाग होता. औरंगाबाद जिल्ह्यात निघालेल्या पहिल्या मोर्चात सुद्धा त्यांनी मोठी जबाबदारी संभाळलेली होती. तसेच राज्यव्यापी समन्वयकामध्ये त्यांचा समावेश आहे. त्यामुळे त्यांनी केलेल्या गंभीर आरोपावरून पुन्हा नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे मराठा आरक्षणाबद्दल राज्यसरकारला विरोध करणारे फक्त भाजपचेच लोक असल्याचा आरोप सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केला होता. त्यानंतर आता मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक काळे यांनी सुद्धा हाच आरोप केला असल्याने भाजपची यावर काय भूमिका असणार आहे? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.