अदानी समुहात 45 हजार कोटींची गुंतवणूक करणाऱ्या फर्जी कंपन्यांचा मालक कोण? भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामींचा सवाल
X
NSDL ने (नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडने) अदानी ग्रृपशी निगडीत असलेल्या तीन परदेशी गुंतवणुकदार कंपनीवर कारवाईचा बडगा उगारल्यानंतर अदानी समुहाचे शेअर्स ढासलळे आहेत. या तीनही कंपन्यांची अदानी समुहामध्ये 43 हजार 500 कोटी रुपयांची गुंतवणूक असल्याचं समजतंय. मिळालेल्या माहितीनुसार या तीनही कंपन्याचे अदानी समुहाच्या अदानी ट्रान्समिशनमध्ये 08. 03 टक्के, अदानी टोटल गॅसमध्ये 5.92 टक्के, अदानी इंटरप्राईजेसमध्ये 6.82 टक्के तर अदानी ग्रीन एनर्जी या कंपनीमध्ये 3.58 टक्के गुंतवणूक आहे.
अदानी समुहाचे शेअर्स पडल्यानंतर आता यावरुन राजकीय वातावरण देखील तापताना दिसत आहे. अदानी समुहाची भरभराट मोदी सरकारच्या आशिर्वादाने होत असल्याची टीका देखील सातत्याने विरोधक करत आहे. मात्र, आता भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी देखील ट्वीट करत अदानी समुहामध्ये गुंतवणूक करणाऱ्या या तीन कंपन्यांचा मालक कोण? असा सवाल उपस्थित केला आहे.
या सर्व आर्थिक घडामोडींमध्ये हा देखील आरोप लावला जात आहे की मॉरिशसमधील खोट्या कंपन्या तयार करून अदानी समुहाच्या कंपन्यांमध्ये काळा पैसे सफेद केले गेले.
कोणत्या कंपन्यांवर कारवाई?
अलबुला इन्व्हेस्टमेंट फंड, क्रेस्टा फंड आणि एपीएमएस इन्व्हेंस्टमेंट फंड या तीन कंपन्यांवर NSDL ने कारवाई करत या कंपन्यांचे खाते गोठवले आहेत.
का झाली कारवाई?
अलबुला इन्व्हेस्टमेंट फंड, क्रेस्टा फंड आणि एपीएमएस इन्व्हेंस्टमेंट फंड या तीनही कंपन्यांच्या खातेदारांबाबत पुरेशी माहिती नसल्याचं समोर आलं आहे. या संदर्भात कंपनीकडे माहिती मागवण्यात आली होती. ही माहिती देण्यास कंपनीने टाळाटाळ केल्यानं या कंपनीवर कारवाई केली आहे.