हर घर तिरंगा रॅलीत सहभागी भाजप खासदाराला 41 हजार रुपयांचा दंड
X
केंद्र सरकारने आझादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमांतर्गत स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली अर्पण करण्यासाठी बाईक रॅली आयोजित केली होती. मात्र या रॅलीत सहभागी झालेल्या भाजप खासदाराला पोलिसांनी मोठा दणका दिला आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमीत्त दिल्लीत भाजप खासदार मनोज तिवारी यांनी लाल किल्ला ते नवीन संसद भवन दरम्यान बाईक रॅली आयोजित केली होती. मात्र या रॅलीत खासदार मनोज तिवारी यांनी हेल्मेट न घालता बाईक चालवली होती. त्यामुळे विना हेल्मेट गाडी चालवण्यासह विविध नियमांतर्गत मनोज तिवारी यांना दिल्ली पोलिसांनी दंड ठोठावला आहे.
दिल्ली पोलिसांनी भाजप खासदार मनोज तिवारी यांना वाहतूक नियमांच्या उल्लंघनप्रकरणी 21 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तर मनोज तिवारी यांनी ज्या व्यक्तीची बाईक चालवली. त्या बाईक मालकालाही 20 हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे.
मनोज तिवारी यांचा हर घर तिरंगा रॅलीत विनाहेल्मेट गाडी चालवल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी बुधवारी मनोज तिवारी यांना दंड ठोठावला आहे. यानंतर मनोज तिवारी यांनी ट्वीट करून आपण हा दंड भरणार असल्याचे म्हटले आहे.
मनोज तिवारी यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, मी आज हेल्मेट घातलं नाही. त्याबद्दल मी माफी मागतो. तसंच दिल्ली पोलिसांनी या ट्वीटच्या माध्यमातून सांगू इच्छितो की, मी हा संपुर्ण दंड भरणार आहे. या फोटोमध्ये गाडीची नंबर प्लेट दिसत असून हा फोटो लाल किल्ला परिसरात काढला आहे. मात्र कोणीही विनाहेल्मेट गाडी चालवू नये, अशी विनंती मी सर्वांना करतो, असं आवाहनही मनोज तिवारी यांनी केले आहे.
या प्रकरणी पोलिसांनी सांगितले की, आम्ही वाहन चालकाला 21 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसंच गाडीच्या मालकालाही दंड ठोठावला आहे. त्यामध्ये पीयूसी प्रमाणपत्र, एसएसआरपी आणि इतर नियमांचं उल्लंघन असा एकूण 20 हजार रुपयांचा दंड बाईक मालकाला केला आहे.