लता दीदींच्या निधनानंतर स्मारकाचे राजकारण, शिवाजी पार्कात स्मारकाची मागणी
X
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. अवघा देश त्यांच्या निधनाने दु:खात असताना आता राजकारणाला सुरूवात झाली आहे. लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्कमधील ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले, त्याच जागेवर त्यांचे स्मारक केले जावे अशी मागणी करण्यात आली आहे. भाजपचे आमदार राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे.
"लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्कमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले गेले. त्याच जागेवर लता मंगेशकर यांचे स्मारक केले जावे, ते जगासाठी एक प्रेरणास्थळ बनेल, " अशी मागणी राम कदम यांनी केली आहे. तर त्यांच्या या मागणीवर शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लतादीदी या भूतलावरचा आत्मा नव्हत्या, त्यांना कधीही विसरता येणार नाही, काहींनी पार्कात स्मारक बनवण्याची मागणी केलीय मात्र मागणीची गरज नाही, यावर राजकारण करू नका, लता दिदींच्या स्मारकाबाबत देशानं विचार करण्याची गरज आहे असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. तसेच लता मंगेशकर यांची एक आठवणही त्यांनी यावेळी सांगितली. "महिन्याभरापूर्वी त्यांचा मला फोन आला होता, मी अटलजींवर बोलत होतो, ते त्यांनी ऐकलं, अटलजी आमचे दद्दा होते असं त्या मला म्हणाल्या होत्या" असे संजय राऊत यांनी सांगितले.