माजी आमदार शिवाजी कर्डीलेंच्या मुलाच्या लग्नाला हजेरी लावलेले भाजप आमदार कोरोना बाधित
भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डीले यांचा मुलाचा शाही विवाह सोहळा काल पार पडला.या विवाह सोहळ्याला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. विवाह सोहळ्यासाठी उपस्थित असलेले राधाकृष्ण विखे पाटील यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
X
अहमदनगर // राज्यात एकीकडे कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना दुसरीकडे राजकीय नेत्यांच्या राजकीय सभा, त्यांच्या नातेवाईकांचे शाही विवाह आणि त्यात होणारी गर्दी काही केल्या कमी होताना दिसत नाहीत.अशाच पद्धतीने अहमदनगर जिल्ह्यातील भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डीले यांचा मुलाचा शाही विवाह सोहळा काल पार पडला.या विवाह सोहळ्याला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. त्याच बरोबर भाजपचे अनेक दिग्गज नेते या विवाह सोहळ्यासाठी उपस्थित होते, ज्यामध्ये विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री राम शिंदे, गिरीश महाजन , राधाकृष्ण विखे पाटील यांची उपस्थिती होती. दरम्यान या विवाह सोहळ्यासाठी उपस्थित असलेले राधाकृष्ण विखे पाटील यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, या विवाह सोहळ्यात मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित असल्याने जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, एकीकडे सर्वसामान्यांसाठी कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करण्यासाठी सक्ती करणारे प्रशासन दुसरीकडे अशा पद्धतीने विवाह सोहळ्यात गर्दी केल्याप्रकरणी अतिशय किरकोळ कारवाई करताना दिसत आहे. याबाबत विवाह सोहळ्याच्या आयोजकांना आधीच नोटीस बजावली होती अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. सोबतच गर्दी जमवल्या प्रकरणी नंतर देखील दंडात्मक कारवाई केल्याचे त्यांनी सांगितले मात्र, केवळ दंडात्मक कारवाई करून काय साध्य होणार हा खरा प्रश्न आहे.