Home > News Update > फसव्या ठाकरे सरकारमुळे शेतकऱ्याची दिवाळी काळी! - हरिभाऊ बागडे

फसव्या ठाकरे सरकारमुळे शेतकऱ्याची दिवाळी काळी! - हरिभाऊ बागडे

फसव्या ठाकरे सरकारमुळे शेतकऱ्याची दिवाळी काळी! - हरिभाऊ बागडे
X

ठाकरे सरकारच्या शेतकरी द्वेषामुळे राज्यातील हजारो शेतकरी कुटुंबांच्या घरात ऐन दिवाळीत अंधार पसरला असून, शेतकऱ्यांची दिवाळी काळी करण्यास ठाकरे सरकारचा नाकर्तेपणा कारणीभूत आहे. वारेमाप आश्वासने व घोषणांचा पाऊस पाडून एकही घोषणा कृतीत न आणणाऱ्या ठाकरे सरकारने आमच्या प्रश्नांची जाहीर उत्तरे द्यावीत, अन्यथा जनतेची व शेतकऱ्याची फसवणूक केल्याप्रकरणी सपशेल माफी मागावी, अशी मागणी भाजपचे आ.हरिभाऊ बागडे यांनी पत्रकार परिषदेत केली.

राज्यातील ५५ लाख हेक्टरहून अधिक शेतजमिनींवरील पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याची सरकारची प्राथमिक आकडेवारी आहे. प्रत्यक्षात १०० लाख हेक्टरहून अधिक जमिनीवरील पिके पूर्ण नष्ट झाली आहेत, आणि पुरामुळे शेतजमिनी नापीक झाल्या आहेत. जमिनींचा कस संपल्यामुळे पुढील दहा वर्षे तरी कोणत्याही पिकाची शाश्वती राहिलेली नाही, आणि ठाकरे सरकार हेक्टरी दहा हजार रुपयांच्या फसव्या मदतीची पाने पुसून शेतकऱ्याची थट्टा करत आहे. जाहीर केलेल्या मदतीपैकी फुटकी कवडी देखील शेतकऱ्यापर्यंत पोहोचलेली नसल्याने राज्यातील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. ठाकरे सरकार म्हणजे शेतकऱ्यांचे बळी घेणारे सरकार ठरले आहे. या दुःखामुळे हजारो शेतकरी कुटुंबांची दिवाळी अंधारात जाणार असून, मातोश्री, वर्षा आणि मंत्रालय मात्र रोषणाईने उजळणार आहे. ठाकरे सरकारला जरा देखील लाज असेल, तर यंदाची दिवाळी शेतकऱ्यांच्या दुःखाची दिवाळी म्हणून जाहीर करून मातोश्री व वर्षावर रोषणाई न करण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावे,असे ते म्हणाले.

गेल्यामहिना अखेरीपर्यंत शेतकऱ्यांनी पीक विम्याच्या २८ लाख पूर्वसूचना दाखल केल्या होत्या. त्यामध्ये आता आणखी काही लाख सूचनांची भर पडली आहे. शेतकऱ्यास वाऱ्यावर सोडणार नाही, असे पोकळ आश्वासन देणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी विमा कंपन्यांना दिलेल्या ९७३ कोटींच्या रकमेपैकी शेतकऱ्याच्या हातात फुटकी कवडी देखील पडलेली नाही, याची सरकारला शरम वाटत नाही का? असा सवालही त्यांनी केला.

सरकारी अधिकारी व दलालांनी संगनमत करून राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक चालविली आहे. अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे पीक हातचे गेले असताना, या पिकाच्या मोठ्या उत्पन्नाचे आमीष दाखवून मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्याची दिशाभूल केली. भेसळयुक्त खते, निकृष्ट बियाणे आणि फसवणुकीमुळे शेतकरी अगोदरच त्रस्त असताना, अतिवृष्टीमुळे हातचे पीक वाया गेल्यावर मात्र ठाकरे सरकार मूग गिळून गप्प आहे, असा आरोप आ.हरिभाऊ बागडे यांनी केला. सप्टेंबर महिन्यात क्विंटलला ११ हजारापर्यंत मिळणारा भाव आता चार ते पाच हजारांपर्यंत घसरल्याने शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान होत आहे. शेतकऱ्याने माल बाजारात आणणे थांबविल्याने आवकही थंडावली असून शेतकऱ्याच्या हाती पैसा नसल्याने दिवाळी अंधारात जाणार आहे.

Updated : 23 Oct 2021 7:00 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top