टक्केवारीच्या टोळीमुळे ठाण्यातील रस्ते खड्ड्यात-आमदार संजय केळकर
X
ठाणे : ठाण्यातील रस्त्यांची झालेली चाळण आणि निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीवरून विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. अशात भाजपाचे आमदार संजय केळकर यांनी खड्डे बुजवण्यासाठी झालेल्या खर्चाची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केल्याने सत्ताधारी आणि प्रशासन कात्रीत सापडले आहे.
महापालिका आणि एमएसआरडीसी अंतर्गत दरवर्षी खड्डे बुजवण्याकरिता कोट्यवधी रुपये खर्च होतात. पण खड्डे पुन्हा जैसे थे होतात आणि कोट्यवधी रुपये पाण्यात जातात. यास निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरणारे ठेकेदार जबाबदार आहेतच, शिवाय टक्केवारीची टोळीही तेवढीच जबाबदार आहे. याबाबत जनतेसमोर खर्चाचा तपशील आला पाहिजे, म्हणून गेल्या पाच वर्षात झालेल्या खर्चाची श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे.
पालकमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दौरा करत आहेत, तेच गेली पालकमंत्री आहेत. ते एमएसआरडीसीचेही मंत्री आहेत. त्यांनी किती ठेकेदारांना काळ्या यादीत टाकले? किती अधिकाऱ्यांवर कारवाई केली, हे जाहीर करावे. पुढील काळात खड्डे, वाहतूक कोंडी आणि अपघातांबाबत अशी गंभीर परिस्थिती होऊ नये, यासाठी कृती आराखडा ठरवण्यासाठी जिल्हा नियोजन समितीची बैठक बोलवावी अशी मागणीही आमदार संजय केळकर यांनी केली आहे.