किरीट सोमय्या पुन्हा कोल्हापूरला जाणार, जिल्हाधिकाऱ्यांना दिला दौऱ्याचा कार्यक्रम
X
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना कोल्हापूर येथे जाण्यापासून रोखण्यात आले. पोलिसांनी त्यांना कराड स्टेशनवरुन ताब्यात घेऊन पुन्हा मुंबईला रवाना केले होते. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर कोट्यवधींच्या घोटाळ्याचा आरोप केल्यानंतर किरीट सोमय्या हे तक्रार देण्यासाठी कोल्हापुरात जाणार होते. पण कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करत पोलिसांनी सोमय्या यांना प्रवेश नाकारला होता. पण आता किरीट सोमय्या यांनी पुन्हा कोल्हापूरला जाणार असल्याचे सांगितले आहे. एवढेच नाही तर त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून आपला कोल्हापूर दौऱ्याचा कार्यक्रमच सांगितला आहे.
सोमय्या यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
प्रति,
मा. श्री. राहुल रेखावार
जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी
कोल्हापूर जिल्हा
विषय: माझा कोल्हापूर दौरा कागल पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यासंबंधात
महोदय,
मी सोमवार, दि. 20 सप्टेंबर रोजी कोल्हापूरला येणार होतो माझ्या दौन्यावर आपण प्रतिबंध टाकला, जिल्हा बंदीचे आदेश दिले. सर सेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना घोटाळी गडहिंग्लज सहकारी साखर कारखाना घोटाळा, श्री. हसन मुश्रीफ परिवार आर्थिक घोटाळा.... या संदर्भात मला कोल्हापूरला यायचे आहे,आवश्यक आहे. स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये या संदर्भात तक्रार व पुरावे दयायचे आहेत. एफआयआर व्हायला हवी.
कोल्हापूर जिल्हा प्रवेशबंदी आदेशात गणेश विसर्जना निमित्त पोलिस व्यस्त आहेत, म्हणून 20 तारखेला प्रवेशबंदीचा आदेश काढण्यात आला. मी आता 27 सप्टेंबर 2021 ला मुंबईहून निघून व 28 सप्टेंबर 2021 ला कोल्हापूर येणार आहे.
माझ्या आधी दिलेल्या कार्यक्रमाप्रमाणे 28 तारखेला (20 सप्टेंबर 2021 रोजी स्थगित करण्यात आलेले कार्यक्रम करणार. 28 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 9.00 वाजता अंबाबाई महालक्ष्मी मातेचे मंदिर दर्शन, आशिर्वाद बाहेरून घ्यायची इच्छा आहे. योग्य व्यवस्था करावी ही विनंती."
असे सोमय्या यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. सोमय्या यांच्या दौऱ्याला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला होता. तसेच ते आल्यास त्यांना धडा शिकवला जाईल असा इशाराही दिला होता. त्यामुळे आचा पोलीस सोमय्यांना परवानगी देतात का ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.