केरळमध्ये जनता भाजपला का मत देत नाही? भाजप नेत्यानंच सांगितलं गुपीत..
X
देशातील 5 राज्यांमध्ये होत असलेल्या निवडणुकीचं वातावरण तापले असून, सर्वच पक्षांनी विजयासाठी आपली ताकद पणाला लावली आहे. त्यातच भाजपला पश्चिम बंगाल प्रमाणे केरळमधून मोठी आशा आहे. मात्र केरळमधील मतदार भाजपला समर्थन देत नसल्याचं समोर आले असून, याचा खुलासा खुद्द भाजप नेत्यानेच केला आहे.
केरळमध्ये 6 एप्रिलपासून टप्याटप्याने मतदानाला सुरवात होणार आहे. भाजपने ज्याप्रमाणे पश्चिम बंगाल ताब्यात घेण्यासाठी रणनीती आखली आहे, त्याचप्रमाणे केरळमध्ये सुद्धा कमळ उगवण्यासाठी जीव पणाला लावला आहे. मात्र मतदान आणि निकालापूर्वीच केरळचे भाजप नेते ओ राजगोपाल यांनी भाजपला घराचा आहेर दिला आहे.
एक इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत राजगोपाल यांनी भाजपला केरळमधून समर्थन न मिळण्याचे कारण सांगितले आहे. केरळमधील साक्षरतेचा दर 90 टक्के आहे. विचार करणे, तर्क लावणे ही शिक्षित लोकांची सवय आहे. त्यामुळे केरळमधील लोक उच्चशिक्षित असल्यानं भाजपला मत देत नाहीत असं राजगोपाल यांनी आपल्या मुलाखतीत म्हंटलं.
तर दुसरी गोष्ट म्हणजे केरळमध्ये 55 टक्के हिंदू आहेत, आणि 45 टक्के अल्पसंख्यांक आहेत. तसेच केरळ इतर राज्यांपेक्ष वेगळं असून,त्याची तुलना बाकी राज्यासोबत केली जाऊ शकत नाही,असेही ओ राजगोपाल यांनी आपल्या मुलाखतीत म्हटलंय.