भाजप सरकार 'सेवा सुशासन आणि गरीब कल्याण' अभियान राबवणार – विनोद तावडे
X
केंद्र सरकारला ९ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्तानं भारतीय जनता पक्षाच्या वतीनं ‘सेवा सुशासन आणि गरीब कल्याण’ अभियान राबविण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. येत्या ३० जूनपर्यंत हे अभियान राबविण्यात येणार आहे.
या अभियानाअंतर्गत ८० कोटी लोकांपर्यंत पोहोचण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. केंद्र सरकारचे मंत्री, भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे लोकसभा मतदारसंघात राबविण्यात येणा-या अभियानात सहभागी होणार आहेत. तसेच अभियानातंर्गत महत्त्वाचे विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. 543 विकास तिर्थांना मंत्री, खासदारांकडून भेटी दिल्या जातील.
9 वर्षाच्या कार्यकाळात विविध योजनांचे लाभार्थी आहेत, त्यांचे संमेलन घेण्याचा विचार केला पाहिजे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ३५० कोटी रूपये खर्च करून घरे बांधली, रस्ते बनवले मात्र, यात ज्यांचा सहभाग होता, रोजंदारीवर काम करणारे देखील संमेलनात सहभागी करण्याचा प्रयत्न आहे, तेही लाभार्थी आहेत. मोदी सरकारच्या काळामध्ये काय मिळवलं या देशाने याबाबत माहितीची पुस्तिका आम्ही छापली आहे. गाव पातळीपासून ते जागतिक पातळीपर्यंत काय देशाने मिळवलेलं आहे, याची सगळी माहिती घराघरांत पोहचवण्याचे काम या अभियानाच्या माध्यमातून करणार आहोत.
या अभियानाच्या अनुषंगानं पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशभरात 12 जनसभा करणार आहेत. सोबतच इतर प्रमुख नेत्यांच्या सभांचं नियोजन करण्यात आलंय. भाजपच्या विविध आघाड्या आणि मोर्चा या सगळ्या आघाड्या आपापल्या क्षेत्रातल्या घटकांना काय मिळालं हे लोकांपर्यंत पोहोचवतील. 23 जूनला जनसंघाचे श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा बलिदान दिवस आहे. यावेळी ऑनलाइन संमेलनाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजप कार्यकर्त्यांच्या बूथ कार्यकर्त्यांना संबोधित करतील.
विरोधकांकडून सध्या भाजपवर करण्यात येत असलेल्या टीकेलाही तावडे यांनी प्रत्युत्तर दिल. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा आमदार छगन भुजबळ यांच्या टीकेला उत्तर देत तावडे म्हणाले, “ज्ञानेश्वरांचा, तुकारामांचा फोटो नव्या संसद भवनात दिसला नाही का, असा सवाल विनोद तावडे यांनी केला आहे. साधुंसोबतचा मोदींचा एक फोटो व्हायरल झालाय. त्याविषयी तावडे म्हणाले,” मोदींच्या आजूबाजूचे साधू ब्राह्मण नाहीत, ते कोणत्या जातीचे आहेत माहिती करा, असाही टोला तावडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला लगावला.