नारायण राणेंच्या त्या वक्तव्यार फडणवीस यांनी सोडले मौन
X
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानशीलात लगावण्याच्या भाषा करणाऱ्या नारायणे राणे यांना आता त्यांच्याच पक्षाने दणका दिला आहे. "नारायण राणे यांच्या त्या वक्तव्याचे आम्ही समर्थन करणार नाही, पण ज्या प्रकारे सरकार बेकायदेशीरपणे, पोलिसांचा गैरवापर करते आहे, ते पाहता पक्ष नारायण राणे यांच्या पाठिशी आहे" या शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी भाजपची भूमिका मांडली आहे.
नारायण राणे यांच्या वक्तव्यानंतर राज्यभरात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. तर नारायण राणे यांच्याविरोधात राज्यात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नाशिक पोलीस नारायण राणे यांना अटक करण्यासाठी रवाना झाले तरी देवेंद्र फडणवीस यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. पण आता देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट केली आहे. नारायण राणे यांच्या त्या वक्तव्याचे समर्थन करणार नाही पण नारायण राणे यांना सरकार बेकायदेशीरपणे त्रास देत असल्याने पक्ष त्यांच्या पाठिशी उभा राहिल असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
नारायण राणे बोलण्याच्या भरात ते बोलून गेले असतील, ते शब्द त्यांनी जाणूनबुजून वापरले नसतील. पण मुख्यमंत्री हे एक महत्त्वाचे आणि आदराचे पद असल्याने त्याबद्दल बोलतांना संयम बाळगणे आवश्यक आहे, अशी नाराजीही फडणवीस यांनी व्यक्त केली. वासरू मारलं तर आम्ही गाय मारू अशी भूमिका योग्य नाही अशी टीका त्यांनी शिवसेनेवरही केली आहे. शरजील उस्मानी राज्यात येऊन देशाविरुद्ध वक्तव्य करुन जातो, त्याला अटक करता येत नाही पण राणेंना बेकायदेशीरपणे अटक करण्यासाठी सरकार कसे सरसावते असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.