बजेट 2021- रस्ते आणि पायाभूत सुविधांसाठी मोठी तरतूद
X
अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या बजेटमध्ये रस्ते आणि पायाभूत सुविधांसाठी मोठ्या प्रमाणात तरतुदीची घोषणा केली आहे. राज्यभरात रस्त्यांच्या कामासाठी ५ हजार ६८९ कोटी रुपये खर्चाची रस्त्यांची कामे करणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली. तर सार्वजनिक बांधकाम विभागासाठी १२ हजार ९५० कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. तसेत बांधकाम विभागाला इमारत बांधकामासाठी ९४६ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे.
नांदेड ते जालना असा २०० किलोमीटरचा नवा मार्ग केला जाणार आहे. तर गोव्याला जाण्यासाठी ५४० किलोमीटर लांबीच्या सागरी मार्गासाठी ९ हजार ५४० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर मुंबईतील पूर्वमुक्त मार्गाला दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे नाव देण्याची घोषणा अजित पवार यांनी केली आहे. बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे काम ४४ टक्के पूर्ण झाले असून, ५०० किमीचा रस्ता १ मेपासून वाहतुकीसाठी खुला केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. समृद्धी महामार्गावर आणि नाशिक-मुंबई महामार्गावर इलेक्ट्रीक चार्जिंग सेंटर उभारण्याची घोषणाही त्यांनी केली आहे. ऊर्जा विभागासाठी ९ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.