BHR घोटाळा : प्रमुख आरोपी जितेंद्र कंडारे गजाआड, आता बड्या हस्ती रडारवर
X
राज्यभर गाजत असलेल्या जळगावमधील भाईचंद हिराचंद रायसोनी म्हणजेच BHR या मल्टिस्टेट पतसंस्थेच्या कोट्यवधींच्या घोटाळ्यातील प्रमुख संशयित आरोपीला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. पतसंस्थेचा तत्कालीन अवसायक जितेंद्र कंडारेला इंदूर येथून पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्याच्याकडून काही कागदपत्रंही ताब्यात घेण्यात आली आहेत. गुन्हा दाखल झाल्यापासून कंडारे हा फरार झाला होता. इंदूर येथे जुन्या वस्तीत वेष बदलून तो लपला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. कंडारेला अटक झाल्याने अनेक बड्या हस्तींचे धाबे मात्र दणाणले आहे.
नोव्हेंबर 2020 मध्ये पुणे डेक्कन जिमखाना पोलीस स्टेशन ला BHR प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या 150 जणांच्या पथकाने जळगाव येथे छापा टाकून झाडाझडती घेतली. या प्रकरणी आतापर्यंत 18 ते 19 जणांना अटक केली आहे. मात्र यातील प्रमुख संशयित आरोपी जितेंद्र कंडारे आणि व्यावसायिक सुनील झंवर फरार झाले होते. झंवर अजूनही फरार असून जामिनासाठी त्याने न्यायालयात अर्ज केला आहे.
BHR चा घोटाळा झाल्यानंतर 2015 मध्ये जितेंद्र कंडारे याला राज्य सरकारने अवसायक म्हणून नेमले होते. बड्या कर्जदारांकडून पैसे वसूल करून ठेवीदारांना पैसे देण्याची जबाबदारी त्याच्यावर होती. मात्र दलाल आणि राजकीय नेत्यांना हाताशी धरून कंडारेने आपल्या पदाचा गैरवापर करून कर्जाच्या बदल्यात मोठ्या प्रमाणात ठेव पावत्या स्वीकारून बेकायदा व्यवहार केले. बनावट वेबसाईट तयार करून संस्थेच्या मालमत्ता कवडीमोल किंमतीत विकल्या. यामुळे अनेक ठेवीदार देशोधडीला लागले आणि BHR चा दुसरा घोटाळा घडवून आणला. ज्याला ही संस्था अवसायनातून बाहेर काढण्याचे काम दिले होते त्यानेच दलाल , कर्जदार , राजकीय पुढारी यांना हाताशी धरून BHR घोटाळा पार्ट दुसरा घडवला.
कंडारेला अटक झाल्याने अनेक बड्या हस्तींचे धाबे दणाणले आहे. यात बडे राजकीय नेते, व्यापाऱ्यांची नावं असावीत अशी शक्यता व्यक्त होतेय. अटक झालेला संशयित आरोपी कुणाकुणाची नावं सांगतो याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
ह्या गुन्ह्यात चांगलंच राजकारणही रंगले आहे. पण BHR प्रकरणी राजकारणही ढवळून निघणार असलं तरी ठेवीदारांना पैसे मिळणार का? हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहेत.