एल्गार परिषद प्रकरण: स्टेन स्वामी यांना रुग्णालयात हलवा, न्यायालयाचे ठाकरे सरकारला आदेश
X
कोरेगाव भीमा हिंसाचारामधील एल्गार परिषद प्रकरणात अटक असलेले स्टेन स्वामी यांना अखेर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिलेल्या निर्देशानुसार स्टेन स्वामी यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांना मुंबईतील खाजगी रुग्णालयात दोन आठवडे उपचारासाठी दाखल करण्याचे सांगितले आहे.
स्टेन स्वामी सध्या तळोजा कारागृहात असून मागील काही दिवसांमध्ये त्यांची प्रकृती ठीक नसल्याचं सांगत झारखंड जन अधिकार महासभेच्या कार्यकर्त्यांसह स्थानिक लोकांनी महाराष्ट्र सरकारला स्टेन स्वामी यांना रुग्णालयात दाखल करण्याची मागणी केली होती. मात्र, एनआयए ने त्यांची जामीन याचिका फेटाळली. मात्र आता उच्च न्यायालयाने याला संमती दिली असून त्यांना वांद्रे येथील होळी फॅमिली रुग्णालयात दाखल करण्याचे निर्देश न्यायाधीश एस. एस. शिंदे व एन. आर. बोरकर यांच्या खंडपीठाने तळोजा कारागृह प्रशासनाला दिले आहेत.
स्टेन स्वामी यांचे वकील मिहीर देसाई यांनी 'स्टेन हे वांद्रे येथील होळी फॅमिली' रुग्णालयात दाखल होण्यासाठी तयार असल्याचं शुक्रवारी सांगितलं होतं. मात्र, त्याला विरोध दर्शवत केंद्र आणि राज्य सरकारने त्यांना जे. जे मध्ये दाखल करण्यास सांगितलं. मात्र, उच्च न्ययालयाने स्वामी यांचे म्हणणे मान्य करत खाजगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी परवानगी दिली. मात्र, होणार खर्च हा तुम्हालाच करावा लागणार असल्याचे ही नमूद केले.
कोण आहेत स्टेन स्वामी?
एल्गार परिषद प्रकरणात गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये स्टेन स्वामी यांना एनआयएने अटक केली होती. स्टेन स्वामी यांच्याविरोधात कठोर युएपीए कायद्यांतर्गत आयपीसीच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, स्टेन स्वामी हे पार्किंसन सारख्या आजाराने ग्रस्त असल्याने वैद्यकीय कारणास्तव केलेला जमीनाचा अर्ज एनआयएच्या न्यायाधीशांनी फेटाळून लावला होता. त्यानंतर कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं होतं.
पत्रात सांगितल्यानुसार स्टेन स्वामी यांनी 14 मे रोजी आपल्या सहकार्यांशी फोनवर बोलतांना त्यांची प्रकृती ठीक नसल्याचं सांगितलं होतं. ते फोन वर बोलू ही शकत नव्हते, औषधं त्यांच्या आरोग्यावर परिणाम करत नसल्याचं ही त्यांनी कार्यकर्त्यांशी बोलतांना सांगितलं होतं.
एल्गार परिषद प्रकरणात अटक करण्यात आलेल्या 16 शैक्षणिक, वकील आणि कार्यकर्त्यांपैकी स्टेन स्वामी एक आहे.