भारत जोडो यात्रेत पडतात रायगडची पाऊले, फक्त १२० कार्यकर्त्यांची निवड.
काँग्रेस नेते राहूल गांधी कन्याकुमारी पासून काश्मीरपर्यंत भारत जोडो यात्रेवर निघाले आहेत. साडेतीन हजार किलोमीटरच्या या यात्रेसाठी देशभरातील ५० हजार कार्यकर्त्यांमधून १२० कार्यकर्त्यांची निवड करण्यात आली आहे.
X
काँग्रेस नेते राहूल गांधी कन्याकुमारी पासून काश्मीरपर्यंत भारत जोडो यात्रेवर निघाले आहेत. साडेतीन हजार किलोमीटरच्या या यात्रेसाठी देशभरातील ५० हजार कार्यकर्त्यांमधून १२० कार्यकर्त्यांची निवड करण्यात आली आहे. या कार्यकर्त्यांमध्ये रायगड जिल्ह्यातील सक्रिय कार्यकर्त्या नंदा म्हात्रे यांचाही समावेश आहे. या पदयात्रेतून सामाजिक ऐक्य , सलोखा व बंधुत्वाचे नाते वृद्धिंगत होत असल्याचे त्यांनी सांगितले. विविध जाती धर्म, वेशभूषा , परंपरा, भाषा व विविधतेने नटलेला भारत समजून घेण्याची संधी या निमित्ताने मिळत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.या पदयात्रेत नंदा म्हात्रे यांच्या रूपाने रायगडची पाऊले देखील पडत आहेत.
कन्याकुमारीपासून निघालेली राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या चार राज्यांचा प्रवास करत तेलंगणात पोहोचली असून ती आता महाराष्ट्रात दाखल झालीय. ५४ दिवसांत १३०० किलोमीटरचा टप्पा यात्रेनी पूर्ण केला आहे. दररोज यात्रेत हजारो कार्यकर्ते, स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी होत असले तरी कन्याकुमारी ते काश्मीर या संपूर्ण भारत यात्रेत केवळ १२० निवडक कार्यकर्त्यांच्या समावेश आहे. जे राहुल गांधी यांच्या समवेत ही संपूर्ण यात्रा पूर्ण करणार आहेत. यात रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील नंदा म्हात्रे यांचाही समावेश आहे. देशभरातील ५० हजार कार्यकर्त्यांमधून त्यांची या पदयात्रेसाठी निवड करण्यात आली आहे. काँग्रेसच्या राजीव गांधी पंचायत राज संघटनेच्या त्या राज्य समन्वयक म्हणूनही कार्यरत आहेत. पेण विधानसभा मतदारसंघातून त्यांनी यापूर्वी निवडणूक लढवली आहे.
यात्रेचा हा अनुभव समृध्द करणारा आहे. भारत समजून घेण्याची संधी यामुळे मिळत आहे. दररोज नवनवीन लोक भेटत आहेत. त्यांचे प्रश्न मांडत आहेत. त्यांचे प्रेम आणि पाठिंबा व्यक्त करत आहेत. हे खूप भारावून टाकणारे असल्याचे नंदा म्हात्रे यांनी सांगितले.
अनेक सामाजिक संस्थाही या यात्रेशी आता जोडल्या गेल्या आहेत. कन्हैया कुमार, योगेंद्र यादव आदी यात्रेत सहभागी झाले आहेत. त्यामुळे भारत जोडो यात्रा काँग्रेसपुरती मर्यादित राहिलेली नाही, ती खऱ्या अर्थाने लोक, समाज आणि विविध घटकांना जोडणारी झाली आहे. या यात्रेचा मी एक भाग आहे याचा मला आनंद आहे, असेही नंदा म्हात्रे सांगत आहेत.
सध्या ही पदयात्रा नांदेड मध्ये दाखल झाली असून महाराष्ट्रात मशाली चेतवून यात्रेचे भव्य दिव्य स्वागत करण्यात आलंय. या यात्रेला सर्व स्थरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय.