रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी COVAXINचा बुस्टर डोस, चाचण्यांना सुरूवात
X
कोरोनावरील भारतीय लस म्हणजे Covaxinच्या तिसऱ्या चाचणीताल निष्कर्ष अखेर जाहीर करण्यात आले आहेत. भारत बायोटेकने Covaxinचे अंतिम निष्कर्ष जाहीर केले आहेत. त्यानुसार या लसीची परिणामकारकता 77.8 टक्के असल्याची माहिती देण्यात आली आहे. SARS-CoV-2 आणि डेल्टा प्लस या कोरोनाच्या विषाणूवरही ही लस 65.2 टक्के प्रभावी ठरत असल्याची माहिती भारत बायोटेकने दिली आहे. कोरोनाची गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांमध्ये या लसीची परिणामकारकता ही 93.4 असल्याचेही कंपनीने सांगितले आहे. ही लस घेतल्यानंतर 12 टक्के लोकांना सामान्य लक्षणे दिसून आली तर गंभीर त्रास झालेल्या लोकांची संख्या केवळ 0.5 टक्के आहे, अशीही माहिती देण्यात आली आहे. कोरनाची लक्षणे नसलेल्या रुग्णांवर ही लस 63.5 टक्के प्रभावी ठरल्याचाही निष्कर्ष देण्यात आला आहे. इतर कंपन्यांच्या लस घेतल्यानंतर जो त्रास होतो त्यापेक्षा कोव्हॅक्सीमुळे होणाऱ्या त्रासाचे प्रमाण अगदीच कमी असल्याचाही दावा कंपनीने केला आहे.
याचबरोबर 2 ते 18 वर्षांच्या आतील मुलांसाठीची लस तयार करताना सुरक्षा आणि परिणामकारकता याबाबत अतिरिक्त काळजी घेत असल्याचेही कंपनीतर्फे सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर बुस्टर डोसची परिणामकारकता आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी चाचण्यांना सुरूवात झाल्याची माहितीही कंपनीतर्फे देण्यात आली आहे. व्हरायंट्स ऑफ कन्सर्न म्हणून कोरोनाचे जे नवे व्हेरायंट आले आहेत त्यावरही ही लस उपयुक्त असल्याचे कंपनीतर्फे सांगण्यात आले आहे. कोव्हॅस्कीनच्या आपत्कालीन वापराला परवानगी देण्यात आली तेव्हा तिसऱ्या चाचणीचे निष्कर्ष आले नव्हते. यावरुन मोठा वादही निर्माण झाला होता, अखेर कंपनीने शनिवारी हे निष्कर्ष जाहीर केले.