भीम जयंती निमित्त अनोखा उपक्रम, १३० महिलांच्या सॅनिटरी पॅडची जबाबदारी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३०वी जयंती नुकतीच साजरी झाली. यानिमित्त भाकर फाऊंडेशनने अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. भारतात कायदेशीररित्या स्त्री स्वातंत्र्य आणि समानतेच्या अनुषंगाने बाजू मांडताना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्री सक्षमतेसाठी उचललेले पाऊल म्हणजे समस्त माणूस जातीला त्यांनी दिलेला एका परिवर्तनीय विचार होता.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या याच विचाराला अनुसरून 'भाकर फाऊंडेशन' च्या माध्यमातून, बाबासाहेबांना त्यांच्या १३० व्या जयंती निमित्त अभिवादन करताना, गोरेगाव पश्चिम येथे पुढील एक वर्षासाठी १३० मुली, असंघटित महिला कामगार व एकल महिलांच्या सॅनिटरी पॅडची जबाबदारी घेत घेण्यात आली आहे. त्याचबरोबर पुढील एक वर्षभर महिलांच्या आरोग्या संदर्भात विविध माहिती सत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे. सायरा शेख, आरती डोईफोडे, चाऊस शेख आणि आकाश क्षीरसागर, बजरंग बाविशे यांनी एकत्र येऊन सॅनिटरी पॅडमधुन १३० भिम जयंती ह्या कलाकृतीचे सादरीकरण केले.
आपला विचार कृतिशीलपणे मांडून समाजासमोर एक नवा विचार ठेवणे ही बाबासाहेबांनी दिलेली शिकवणच आपण त्यांच्या जयंतीनिमित्त यांना अभिवादन स्वरूपात देत आहोत याचा आनंद आहे. आणि भाकर फाऊंडेशन म्हणुन अभिमान ही आहे अशी माहिती भाकर फाऊंडेशन संस्थापक दिपक सोनावणे यांनी दिली आहे.