बेस्टच्या ४०० सीएनजी बस बंद...
X
गेल्या महिनाभरात बेस्टच्या ताफ्यातील तीन सीएनजी बस जळून खाक झाल्याने बेस्टने असा ४०० बस पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय बुधवारी घेतला. यामुळे आता बेस्टचा सर्व भार इलेक्ट्रीक बसवर असणार आहे. आणि त्यामुळे मुंबईतील प्रदुषणाला सुद्धा थोड्याफार प्रमाणात आळा घालण्यात यश मिळणार आहे.
बेस्टच्या ताफ्यातील जवळपास ४०० सीएनजी बस यापुढे रस्त्यावर धावताना दिसून येणार नाही. असे बेस्ट प्रशासनाने बुधवारी स्पष्ट केले आहे. अंधेरी रेल्वे स्थानक परिसरातील आगरकर चौक येथे बुधवारी सीएनजी बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यानंतर बेस्टने हे पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे. मे. मातेश्वरी कंपनीद्वारे चालविण्यात येणाऱ्या टाटा कंपनीच्या सीएनजी वर चालणाऱ्या दोन बसगाड्यांना आग लागण्याच्या घटना घडल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे. बुधवारी त्याची पुनरावृत्ती झाली.
बेस्ट बस क्रमांक ४१५ अंधेरी रेल्वे स्थानक परिसरातील आगरकर चौक येथे आली तेव्ही ती प्रवाशांनी पूर्णपणे भरलेली होती. आणि बसचा शेवटचा थांबा असल्याने सर्व प्रवासी उतरल्यानंतर ६.५५ च्या सुमारास बसने अचानक पेट घेतला. आगीची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेवून पुढच्या २० ते २५ मिनिटात आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र तोपर्यंत बस जळून खाक झाली होती. बसला लागलेल्या आगीमुळे अंधेरी स्थानकाकडे जाणारा एक मार्ग बंद करण्यात आला होता. त्यामुळे परिसरात मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.
यापूर्वी २५ जानेवारी आणि ११ फेब्रुवारी रोजी सीएनजी वरील बसला आग लागण्याच्या घटना घडल्या होत्या. तर बुधवारी बसला आग लागण्याची ही तिसरी घटना घडली होती. त्यामुळे आता यापुढे बसमध्ये आवश्यक ते बदल आणि योग्य उपाययोजना करेपर्यंत ४०० बसगाड्या बंद ठेवण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे आगामी काळात बेस्टच्या वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवशांनी प्रवास करताना आपल्या प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन बेस्ट ने नागरिकांना केले आहे. प्रवाशांनी ४०० बस बंद झाल्याची नोंद घेवून आपले प्रवासाचे वेळापत्रक ठरवावे, असे आवाहन सुद्धा बेस्टने केले आहे.