100 वर्षांपासून प्रलंबित मार्गाचा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी सोडवणार का?
बेलापूर परळी 100 वर्षांपासून प्रलंबित मार्गासाठी भाऊसाहेब वाकचौरे रेल्वे मंत्र्यांच्या भेटीला
X
बेलापूर परळी रेल्वे मार्गाला केंद्रीय मंजुरी देऊन तातडीने निधीची तरतूद करण्यात यावी या मागणीसाठी शिर्डी लोकसभेचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, नेवासा मतदार संघाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, व बेलापूर परळी रेल्वे प्रवासी सेवा संस्थेचे सचिव रितेश भंडारी यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे निवेदन दिले आहे. ब्रिटीशांनी १९२२मध्ये हा मार्ग मंजूर केला होता. रेल्वे रुळ टाकण्यासाठी भूसंपादनही झाले होते. मात्र, तब्बल ९५ वर्षांपासून हा प्रकल्प रखडला आहे. आता हा प्रकल्प झाला तर मंजुरीनंतर तब्बल १०० वर्षांनी तो प्रत्यक्षात येण्याचा आगळावेगळा विक्रमही या प्रकल्पाचा होऊ शकतो.
बेलापूर परळी रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण डिसेंबर २०१८ मध्ये पूर्ण झाले होते व तो अहवाल रेल्वे बोर्डाकडे सादर करण्यात आला होता. परंतु तांत्रिक अडचणीमुळे हा अहवाल पुन्हा मुंबई कार्यालयात आला. ही माहिती मिळताच माजी खासदार वाकचौरे, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे व सेवा संस्थेने याचा पाठपुरावा केला.
यामुळे हा अहवाल पुन्हा जून महिन्यात रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात आला. ही माहिती मिळताच उभय नेत्यांनी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वे मंत्री व रेल्वे राज्य मंत्री यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे.
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव व राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी सकारात्मकता दाखवत या अहवालावर पुढील कार्यवाही करून लवकरच न्याय देण्यात येईल असे आश्वासन दिलं आहे.