Home > News Update > कोरोनाला गावच्या वेशिबाहेरचं रोखणारी 151 गावं!

कोरोनाला गावच्या वेशिबाहेरचं रोखणारी 151 गावं!

कोरोनाला गावच्या वेशिबाहेरचं रोखणारी 151 गावं!, गावात कोरोना न आल्यानं एकाही व्यक्तींचा कोरोनाने मृत्यू नाही. गावकऱ्यांनी कोरोनाला रोखण्यासाठी नक्की काय केलं? वाचा कोरोनाला गावच्या वेशिबाहेरचं रोखणारी 151 गावं...

कोरोनाला गावच्या वेशिबाहेरचं रोखणारी 151 गावं!
X

राज्यात कोरोनाचा कहर सुरू आहे. दररोज वाढत असणारा कोरोना रुग्णांचा आकडा आणि त्यात वाढणारे मृत्यूचे प्रमाण, नागरिकांसह प्रशासनातील अधिकार्‍यांच्या मनात धडकी भरवत आहेत. कुणाला बेड नाही तर कुणाला ऑक्सिजन नाही. कोरोनाने गावची गाव पोखरली आहेत. मात्र एकीकडे कोरोनाने सर्वांना हतबल केलं असताना, दुसरीकडे बीड जिल्ह्यात 151 गावच्या ग्रामस्थांनी शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून, आपल्या गावात कोरोनाला येण्यापासून रोखलं आहे.

या गावात प्रत्येक व्यक्ती कोरोनाच्या नियमांचं पालन काटेकोर पणे करत असल्यानं, या गावातील ही वृद्ध मंडळी आपलं आयुष्य चांगल्या वातावरणात जगत आहेत. या गावची लोकसंख्या जवळपास 2 हजार आहे. त्यात या वृद्ध मंडळींचा आकडा देखील मोठा आहे. एकीकडं राज्यात कोरोनाने थैमान घातलं असतांना, या गावात अद्याप कोरोनाचा एकही रुग्ण निघाला नाही. हे कसं करून दाखवलं?

टिप्पटवाडीचे सरपंच विष्णू शेंडगे सांगतात... गावच्या प्रत्येक नागरिकांनी कोरोनाच्या लढ्यात जबाबदारीने आपली कर्तव्य पार पाडली. ऊस तोडणीहून आलेल्या किंवा पर जिल्ह्यातून आलेल्या ग्रामस्थांना गावालगत 15 दिवस क्वारंटाईन केलं. त्यांची सर्व जबाबदारी इतर गावकऱ्यांनी घेतली. गावातील यात्रा उत्सव, सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले. विवाह सोहळा मोजक्या लोकांमध्ये पार पाडले.

सामुदायिक ठिकाणी लोकांना जमू न देणं, सतत मास्कचा वापर करणं. या नियमांचं पालन केलं. ग्रामपंचायतीत दक्षता समिती नेमली होती. त्यानुसार कारखान्यातून येणाऱ्या लोकांना १५ दिवस बाहेर ठेण्यात आलं. शासनाच्या प्रत्येक नियमांचं पालन केल्यानं, आज या गावात एकही कोरोना रुग्ण नसल्याचं सांगत गावकऱ्यांना याचा अभिमान देखील वाटत आहे.

ग्रामस्थ किशोर भगत सांगतात... बीड जिल्ह्यात 1031 गावं आहेत. त्यापैकी आजपर्यंत 880 गावात या महामारीनं आपले मुळं रोवली आहेत. मात्र, या टिप्पटवाडीसह 151 गावात अद्याप कोरोनाचा एकही रुग्ण सापडलेला नाही. शासनाने सांगितलेल्या नियमांचं पूर्णपणे पालन टिप्पटवाडी गावातील प्रत्येक नागरिकाने केलं आणि त्यामुळे गावात एकही कोरोना संक्रमित रुग्ण आढळलेला नाही.

शासनाच्या नियमांना तडा न देता दिलेल्या नियमांचं पालन संबंध गाव करत. गावत एकूण १७०० - १८०० लोक आहेत. तसेच या निमित्ताने आम्ही इतर गावांना आवाहन करत आहोत "गावातील लोकांनी सोशल डिस्टर्नसिंगच पालन करावं तसंच काही आजार किंवा काही लक्षण असतील तर स्वतः quarantine राहावं. गावाबाहेर quarantine साठी जागा बनवावी. सामाजिक जागृतीसाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करा आणि आपल्या प्रत्येक प्रिय व्यक्तीला कोरोनाच्या या भयानक आजारापासून वाचवा.''असं किशोर भगत यांनी सांगितलं आहे.


पाहुयात जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यातील किती गावांनी कोरोनाला वेशिवरचं रोखलंय.

१ - बीड तालुका - 14

२ - अंबाजोगाई - 09

३ - आष्टी - 08

४ - किल्ले धारूर - 36

५ - गेवराई - 41

६ - केज - 04

७ - माजलगाव - 05

८ - पाटोदा - 15

९ - परळी - 31

१०- शिरूर कासार - 02

तर याविषयी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांच्याशी बातचीत केली असता ते सांगतात... आज जिल्ह्यातील गावच्या गाव कोरोनाच्या या विळख्यात अडकले आहेत. त्यात दररोज हजारी पार निघणारा कोरोना रुग्णांचा आकडा आता चौदाशे पार झाला आहे. त्यामुळं गावातील कित्येक घर ओस पडली आहेत. तर कित्येक घरातील व्यक्ती गेल्यानं घरात स्मशान शांतता पसरली आहे. त्यामुळं आज जो तो आपल्या कुटुंबाला सावरण्यासाठी लढत आहेत. मात्र, बीडच्या 151 गावातील ग्रामस्थांनी शासनाच्या सूचनांचे योग्य पालन केलं. गावात स्वतंत्र क्वारंटाईन केंद्र सुरू केलं आहे. सार्वजनिक कार्यक्रमांना आवर घातला. त्यामुळं हे या गावच्या ग्रामस्थांनी करून दाखवलं.

कोव्हीड - १९ ला थांबवण्यासाठी कोव्हीड-१९ प्रतिबंधात्मक दलांची गाव पातळीवर स्थापना केली आणि गावातील सरपंच, ग्रामसेवक, सदस्य, तरुण कार्यकर्ते, अंगणवाडी सेविका यांच्या मदतीने उपाययोजना केल्यामुळे गावात एकही कोरोना रुग्ण आढळून आला नाही. असं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी मॅक्समहाराष्ट्रशी बोलताना सांगितलं.

एकंदरीत पाहिलं तर आज राज्यासह जिल्ह्यात कोरोनाची वाईट परस्थिती निर्माण झाली आहे. तरी देखील अनेक जण कोरोनाचे नियम पायदळी तुडवून विनाकारण रस्त्यावर येत आहेत. गर्दी करत आहेत. यामुळं कोरोना आज घराघरापर्यंत जात आहे. मात्र, या 151 गावांनी शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून कोरोनाला गावच्या वेशीबाहेरचं रोखलंय.

सध्या राज्यातील कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाऊन लावण्यात आला आहे. तर दुसरीकडे राज्यातील इतर जिल्ह्यात शासनाच्या नियमाप्रमाणे ब्रेक द चेन अंतर्गत लॉकडाऊन लावण्यात आला असला तरी रुग्ण संख्या 50 हजारांच्यावर गेली आहे. दिनांक 4 मे च्या शासनाच्या आकडेवारीनुसार राज्यात ६५,९३४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर राज्यात ५१ हजार ८८० नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर ८९१ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.४९% एवढा आहे.

राज्यात कोरोना रुग्ण बरं होण्याचं प्रमाण ८५.१६% इतके आहे. सध्या राज्यात ३९ लाख ३६ हजार ३२३ व्यक्ती होमक्वारांटाईनमध्ये आहेत. तर ३० हजार ३५६ व्यक्ती संस्थात्मक क्वारांटाईनमध्ये आहेत. राज्यात सध्या एकूण ६ लाख ४१ हजार ९१० एक्टिव्ह रुग्ण आहेत.

ही आकडेवारी पाहिल्यानंतर आपल्याला कोरोनाच्या विरोधात या गावांनी जसा लढा दिला तसा लढा दिला तर आपले सर्व नातेवाईक जीवंत राहतील. त्यामुळं या गावकऱ्यांचा आदर्श राज्यातील इतर गावांनी देखील घेतला तर ना कुणाला रेमडेसीवर शोधावं लागणार ना कुणाला ऑक्सिजन बेड. त्यामुळं सर्व गावांनी या गावांचा आदर्श घेतला तर राज्यातून कोरोना गेल्याशिवाय राहणार नाही.

Updated : 8 May 2021 11:15 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top