5 कोटी लोकवर्गणीतून अडीच हजार शाळांच्या रंगल्या भिंती
X
सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या 'स्वच्छ शाळा सुंदर शाळा' या उपक्रमाला जिल्ह्यात सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळाला आहे. जिल्ह्यात 5 कोटी रुपयांच्या लोकवर्गणीतून अडीच हजार शाळा सुंदर झाल्या आहेत. यातून शाळांची रंगरंगोटी, बाग बगीचा, सीसीटीव्ही, संगणक, चित्रकलाकृती असं काम झालं आहे. सोलापूर जिल्हा परिषदेने जिल्ह्यात राबवलेल्या 'स्वच्छ शाळा, सुंदर शाळे'च्या उपक्रमाची राज्याचे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दखल घेतली आहे. अत्यंत चांगला हा उपक्रम राज्यात सर्वत्र राबवणे योग्य असून जिल्हा परिषदेच्या सीईओनी या उपक्रमाचे सादरीकरण करण्यासाठी मुंबईत यावे असे निमंत्रण त्यांनी दिले आहे.
राज्याचे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड,शिक्षण विभागाचे अप्पर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनी संपूर्ण राज्यातील जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शिक्षणाधिकारी यांच्याशी ऑनलाइन संवाद साधला, यावेळी सोलापूर जिल्हा परिषदेने या ऑनलाईन संवादात स्वच्छ शाळा सुंदर शाळा अभिनयाची माहिती शिक्षण मंत्र्यांसमोर सादर केली. या उपक्रमातून शाळांचा झालेला कायापालट पाहून शिक्षण मंत्र्यांनी जिल्हा परिषदेच्या कामाचं कौतुक करून या विषयाचे सादरीकरण करण्यासाठी मुंबईला येण्याचे निमंत्रण सीईओ यांना दिला आहे. हा सोलापूर पॅटर्न भविष्यात राज्यात आणि राज्याबाहेर सर्वत्र लागू होईल असा विश्वास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी व्यक्त केला.