आपला माणूस, आपला स्वाभिमान म्हणजे बाळासाहेब थोरात- इंदुरीकर महाराजांकडून कौतुकाचा वर्षाव...
X
नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवेळी झालेल्या राजकारणाचा निषेध करत विधानसभेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते बाळासाहेब थोरात यांनी मंगळवारी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदाचा राजीनामा दिला आणि राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. मात्र यावर इंदुरीकर महाराजांकडून बाळासाहेब थोरात यांच्या आपला माणूस, आपला स्वाभिमान अशा शब्दात कौतुकाचा वर्षाव केला.
आज बाळासाहेब थोरात यांचा वाढदिवस...मात्र राज्याच्या राजकारणात एक खळबळजनक घटना घडली त्यामुळे सर्वजण स्तब्ध झालेले पाहायला मिळाले. आज बाळासाहेब थोरात यांनी आपल्या वाढदिवशी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ गटनेते पदाचा राजीनामा दिला. मात्र यावर समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी थोरात यांचे कौतुक केले आहे. थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कीर्तनात इंदुरीकर महाराज यांनी विविध अध्यात्मिक दाखले देत 'देवपण येण्यासाठी मोठे कष्ट सोसावे लागतात. लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात हे सर्वसामान्य नेतृत्त्व आहे. संगमनेर तालुका व जिल्ह्यासाठी हा आपला माणूस आपला स्वाभिमान आहे', असे इंदुरीकर महाराज म्हणाले.
संगमनेर तालुक्यातील हरी बाबा मित्र मंडळाच्या वतीने बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त कीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. त्याची सांगता केक कापून आमदार बाळासाहेब थोरात यांचा वाढदिवस साजरा करुन करण्यात आली. यावेळी आमदार सत्यजित तांबे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्याप्रमाणे समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख यांनी संगमनेरचे नाव राज्य पातळीवर नेले असल्याचे सांगितले.
बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना विधिमंडळ नेतेपदाचा राजीनामा देण्याची वेळ आली. याबाबत काँग्रेस पक्षाच्या हायकमांडने आत्मपरिक्षण करणे गरजेचे असल्याचे मत आमदार सत्यजीत तांबे यांनी यावेळी व्यक्त केले. एका पक्षासोबत शंभर वर्ष एक कुटुंब राहू शकते, आणि अशा कुटुंबावर जर अशी वेळ येणार असेल तर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी आत्मपरिक्षण करण्याची गरज असल्याचे मत सत्यजीत तांबे यांनी यावेळी व्यक्त केले.