शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचे आज भूमिपूजन
X
गेली काही वर्ष रखडलेल्या दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे भूमिपूजन ३१ मार्च रोजी म्हणजे बुधवारी होणार आहे. संध्याकाळी महापौर निवास येथे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते भूमिपुजन करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित राहणार आहेत. भूमिपुजनाच्या कार्यक्रमाला भाजप नेत्यांना निमंत्रण आहे की याबाबत अजून कोणतीही माहिती मिळालेली नाही.
तीन वर्षापूर्वी तत्कालीन मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या निवड समितीने मुंबईतील अनेक जागांची पहाणी करून शिवाजी पार्क नजिकच्या महापौर निवासस्थानाची निवड केली होती. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने उध्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली विश्वस्त समितीची नियुक्ती केली. स्मारक वास्तुशिल्पाचा आराखडा बनविण्यासाठी एक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. वास्तुविशारदांनी सादर केलेल्या आराखड्यांमधून वास्तुविशारद आभा लांबा यांनी तयार केलेला आराखडा सर्वोत्कृष्ट ठरला. २०१९ मध्ये उच्च न्यायालयातील प्रलंबित खटल्याचा निकाल लागून रस्त्यालगतचा भूखंड महापालिकेकडे व पर्यायाने स्मारकासाठी उपलब्ध झाल्यामुळे मूळ आराखड्यात बदल करावे लागले. सरकारने या स्मारकासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची प्रकल्प समन्वयक यंत्रणा म्हणून नियुक्ती करुन ४०० कोटी निधीही मंजूर केला आहे.
मे.टाटा प्रोजेक्टस लि. यांच्यामार्फत हे स्मारक बनवण्यात येणार आहे. प्रकल्पात प्रवेश इमारत, स्मारक वस्तुसंग्रहालय इमारत व प्रशासकीय इमारत अशा तीन बैठ्या वास्तू असतील. या संपूर्ण भुखंडावर सध्या असलेल्या वृक्षांचे जतन करण्यात येणार आहे. स्मारकाचा पहिला टप्पा १४ महिन्यांमध्ये पूर्ण केला जाणार आहे. या स्मारकाच्या भूमिपूजनाचा सोहळा ऑनलाईन पाहता येणार आहे.