सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मागासवर्गीय आयोग स्थापन करण्याची सरकारची तयारी - मेटे
X
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मागासवर्गीय आयोग स्थापन करण्याची तयारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दाखवल्याची माहिती शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी दिली. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आज महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर मेटे यांनी ही माहिती दिली.
या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विनायक मेटे, मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि अन्य सचिव उपस्थित होते.
मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मागासवर्गीय आयोग स्थापन करण्याची तयारी मुख्यमंत्र्यांनी दाखवली आहे. सर्व प्रक्रिया तपासून मागासवर्गीय आयोग स्थापन करु असं मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचं मेटे म्हणाले.
त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयातील फेरविचार याचिकेवरही या बैठकीत चर्चा झाली. तसंच भरती प्रक्रियेत मार्ग काढला जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचं मेटे म्हणाले.
दरम्यान आजच्या बैठकीत कोपर्डी आणि तांबडी प्रकरणावर देखील चर्चा झाल्याचे मेटे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले, ज्यात कोपर्डी संदर्भात तातडीने आवश्यक पाठपुरावा करण्याच्या सूचना संबंधिताना देण्यात आल्या, तसेच तांबडी येथील पीडितेच्या घरच्यांना तातडीने 10 लाखांची मदत तसेच कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्याचे विनायक मेटे यांनी सांगितले.