कोलंबियात प्रकाशित झालेल्या बाबासाहेबांच्या या पुस्तकाची होतेय जगभर चर्चा !
X
अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात 'आंबेडकराईट स्टुडंटस ऑफ कोलंबिया'च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या समारोहात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर लेखक व वक्ते जगदीश अशोक ओहोळ यांनी लिहिलेले प्रेरणादायी पुस्तक 'जग बदलणारा बापमाणूस' या पुस्तकाच्या दहाव्या आवृत्तीचे प्रकाशन अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंती महोत्सव कार्यक्रमात मोठ्या थाटात अनेक आंतरराष्ट्रीय विद्यापीठातील ज्ञानवंत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात प्रमुख वक्ते म्हणून हार्वर्ड विद्यापीठाचे स्कॉलर, लेखक, विचारवंत डॉ. सुरज एंगडे, तर प्रमुख पाहुणे म्हणून कोलंबिया विद्यापीठातील जर्नालिझम विभागाचे प्रमुख जेलनी कॉब हे उपस्थित होते. यावेळी अमेरिकेतील 'आंबेडकराईट स्टुडंटस ऑफ कोलंबिया'चे प्रमुख व सिनेट कार्यक्रमाचे आयोजक विकास तातड, अभ्यासक चारुदत्त म्हसदे, नाशिक येथील संविधान प्रचारक शिवदास म्हसदे, मिलिंद अवसरमोल, नितीन सूर्यतळे (आंबेडकर इंटरनॅशनल मिशन), फिलिप मार्टिन ( senior investigative reporter ) यांसह कोलंबिया विद्यापीठातील अनेक दिग्गज मान्यवरांची विशेष उपस्थित होती. या सर्व मान्यवरांच्या हस्ते 'जग बदलणारा बापमाणूस' या पुस्तकाच्या दहाव्या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले.
नुकतेच 3 डिसेंबर 2023 रोजी प्रकाशित झालेल्या या पुस्तकाच्या 14 एप्रिल 2024 रोजी अमेरिकेत 10 व्या आवृत्तीचे प्रकाशन झाले हे विशेष ! या पुस्तकामुळे मी पुन्हा वाचनाकडे वळलो, असे अनेक तरुण वाचक आवर्जून सांगत आहेत. अगदी कमी कालावधीत या पुस्तकाने विक्रीचा नवा उच्चांक गाठला आहे.
लेखक, जगदीश ओहोळ काय म्हणाले ?
पुस्तकावर लोक जे प्रेम करत आहेत, ते पुस्तकातील आशय आणि त्यातून त्यांना पटलेले जागतिक प्रेरणादायी बाबासाहेब, यामुळे लोक इतका भरभरून प्रतिसाद देत आहेत. नव्या पिढीला, नव्या भाषेत मोटिव्हेशनल आणि सर्वांचे बाबासाहेब आंबेडकर सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे. वाचकांना तो आवडला आहे. सर्वांचे आभार! लवकरच या पुस्तकाच्या इंग्रजी व हिंदी भाषेतील आवृत्ती प्रकाशित करू.
विकास ताताड, 'आंबेडकराईट स्टुडंटस ऑफ कोलंबिया' अमेरिका
कोलंबिया विद्यापीठात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण झाले. आज येथे अनेक विद्यार्थी बाबासाहेबांच्या प्रेरणेतून शिक्षण घेत आहेत. कोलंबियात 'आंबेडकराईट स्टुडंटस कोलंबिया' च्या माध्यमातून भीमजयंती सह वेळोवेळी आम्ही आंबेडकरी विचारांचे विविध कार्यक्रम घेत असतो. या जयंती महोत्सवात भारतातील वक्ते व लेखक जगदीश ओहोळ यांनी लिहिलेले 'जग बदलणारा बापमाणूस' या प्रेरणादायी पुस्तकाच्या दहाव्या आवृत्तीचे प्रकाशन अनेक मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. हे पुस्तक नव्या पिढीला जागतिक व सर्वव्यापी बाबासाहेब सांगणारे महत्वाचे पुस्तक आहे.